नितीश कुमारांनी ‘या’साठी शिवसेनेचे आभार मानायला हवेत – संजय राऊत

shivsena mp sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आघाडीची आकडेवारी पाहाता सध्या भाजप-जदयूची एनडीए आघाडीवर असून राजद-काँग्रेसची महागठबंधन पिछाडीवर आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत, असं देखील सांगितलं आहे. शिवसेनेमुळेच नितीश कुमारांना भाजपकडून योग्य वागणूक मिळत असल्याचं देखील संजय राऊत यांनी नमूद केलं आहे. बिहारमध्ये आता तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली जंगलराज संपून मंगलराज सुरू होतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सकाळी दिली होती.

काय म्हणाले संजय राऊत?

‘अजूनही ७० जागा अशा आहेत, जिथे ३० ते ४० टक्के मतांची मोजणी झाली आहे. मतमोजणीचा कल एनडीएच्या बाजूने आहेत. भाजप पहिल्या तर नितीश कुमार तिसऱ्या स्थानावर आहेत. पण या निवडणुकांचा मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लोकशाहीत असे निकाल येत असतात. पण जेव्हा पूर्ण निकाल येतील, तेव्हा त्यावर बोलता येईल. कधीतरी मॅच हरतो, पण त्यातल्या एखाद्या खेळाडूला कधीकधी मॅन ऑफ द मॅच दिलं जातं. त्याने दाखवलेल्या झुंजार वृत्तीसाठी ते त्याला दिलं जातं. ३० वर्षांचा एक युवक ज्याला आसपास मदत करायला कुणी नाही, त्याला मित्रपक्षाचा पाठिंबा नाही, कुटुंबाचा पाठिंबा नाही, केंद्र-राज्य सरकारची सत्ता त्याच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत देश, राज्य, पंतप्रधानांविरोधात एक तरूण एकटा लढा देतो आणि पूर्ण निवडणूक त्याच्या भोवती फिरवतो. त्यावरून बिहार निवडणुकीतून बिहारला एक भविष्यातला चेहरा मिळाला आहे’, असं राऊत म्हणाले.

नितीश कुमाल, आभार माना!

दरम्यान, नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत, असं देखील राऊतांनी सांगितलं. ‘राज्यात तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेला पक्ष तिसऱ्या क्रमांकावर जात असेल, तर त्यावर विचार करायला हवा. तुम्ही बिहारचा चेहरा आहात. तुमच्या नेतृत्वाखाली एनडीएनं निवडणुका लढवल्या. पण तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहात. भाजपचे सगळे नेते म्हणतात की नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. नितीश कुमारांनी यासाठी शिवसेनेला धन्यवाद द्यायला हवेत. शिवसेनेने भाजपला ज्या पद्धतीने पलटवार दिला, त्यामुळे भाजप त्यांच्या मित्रपक्षांसोबत नीट वागू लागले आहेत’, असं राऊत म्हणाले.