घरमुंबईउद्धव ठाकरे अयोध्येत; तर हार्दिक, जिग्नेश, कन्हैय्या मुंबईत!

उद्धव ठाकरे अयोध्येत; तर हार्दिक, जिग्नेश, कन्हैय्या मुंबईत!

Subscribe

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देशातल्या १४ प्रमुख युवा संघटना संविधान बचाव रॅली काढणार आहेत. दादरच्या चैत्यभूमीवर या रॅलीसा समारोप होईल.

राम मंदिराचा मुद्दा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह अयोध्येमध्ये असतानाच मुंबईतही वातावरण तापू लागलं आहे. २६ नोव्हेंबरला असणाऱ्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध १४ संघटना संविधान रॅली काढली. यामध्ये भाजप विरोधातल्या सर्व पक्षांसोबतच विविध डाव्या चळवळीतल्या संघटनांचाही समावेश आहे. जिग्नेश मेवाणी, कन्हैय्या कुमार, हार्दिक पटेल अशी भाजपविरोधातल्या आघाडीची युवा नेतेमंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधली नेतेमंडळीही या रॅलीमध्ये असणार आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना अयोध्येत राम मंदिरावरून वातावरण निर्मिती करत असतानाच दुसरीकडे विरोधी पक्ष आणि संघटना संविधान बचावच्या अनुषंगाने भाजप सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे.

Sanvidhan Bachav Rally in Mumbai
मुंबई संविधान बचाव रॅली

देशातल्या मनुवादी विचारसरणीच्या भाजप सरकारनं थेट संविधानावरच हल्ला केला आहे. भाजप सरकारने संविधान हटवून मनुस्मृती लागू करण्याचं कारस्थान सुरू केलं असून त्यासाठीच संविधान बचाव रॅली काढली आहे.

जिग्नेश मेवाणी, आमदार, गुजरात

काही लोकं देश असुरक्षित असल्याचं वातावरण निर्माण करत आहेत. पण देशात ना हिंदू असुरक्षित आहेत ना मुसलमान असुरक्षित आहेत. हा देश आणि देशाचं संविधान असुरक्षित आहे. संविधान सर्व जातीधर्मांना एक ठेवतं. त्यामुळे संविधान वाचवणं गरजेचं आहे.

कन्हैया कुमार, युवा नेता

मुंबईतही वातावरण तापलं!

मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या राजगृह या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरापासून या संविधान बचाव रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधली कथित घोषणाबाजी प्रकरणात नाव समोर आलेला आणि नंतर अघोषित नेतेपद मिळालेला कन्हैय्या कुमार ही युवा नेतेमंडळी सहभागी झाली आहेत. त्यामुळे मुंबईतली हवा देखील तापू लागली आहे. देशातल्या एकूण १४ प्रमुख संघटना या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत. युनायटेड युथ फ्रंटच्या माध्यमातून ही रॅली काढण्यात आली आहे. दादरच्या चैत्यभूमीवर या रॅलीचा संध्याकाळी ५ वाजता समारोप होईल.

- Advertisement -

हेही वाचा – अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

एकाच दिवशी अयोध्या आणि संविधान रॅली!

अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संविधान दिनानिमित्ताने विरोधकांनी राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारला घेरण्यासाठी मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यातच अयोध्या आणि संविधान हे मुद्दे आज एकाच दिवशी चर्चेत आल्यामुळे त्याचा चांगलाच फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -