घरमुंबईसविता रणदिवे यांचे निधन

सविता रणदिवे यांचे निधन

Subscribe

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या सविता रणदिवे यांचे शनिवारी पहाटे दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. भायखळा येथील मम्माबाई हाईस्कूलमधून प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. पहाटे झोपेतच त्यांचे निधन झाले.

सविता यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले होते. राष्ट्रसेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या सविता या दिनू यांच्यासाठी प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या प्रत्येक कार्यात सविता यांनी समर्थ साथ दिली. दिनू यांनी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना व्यंगचित्र काढण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी ती मान्य केली. विशेष म्हणजे बाळासाहेब यांच्याकडून दररोज व्यंगचित्र आणायचे काम सविता या करत असत.

- Advertisement -

शिक्षक संघटनेच्या त्या कार्यकर्त्या होत्या. शिक्षक संघटनेचे अर्ध्वयू तात्या सुळे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी १९५६ साली शिवाजी पार्क येथे सर्वभाषिकांच्या झालेल्या पहिल्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. गुजराती भाषिकांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणात मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग असावा, अशी आग्रही भूमिका मांडली होती.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच आपले ध्येय मानून सविता यांनी दिनू यांच्याबरोबर सामाजिक कामांना वाहून घेतले होते. श्रमिक, आदिवासी, कामगार, शोषित यांच्या त्या मोठ्या आधार होत्या.

- Advertisement -

व्रतस्थाची सावली हरपली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. सविताताई ध्येयवादी पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या होत्या. एका व्रतस्थाची ही सावली हरपली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. निखळ पत्रकारितेसाठी जीवन अर्पण करणार्‍या दिनू रणदिवे यांच्या मागे सविताताई तितक्याच खंबीरपणे उभ्या होत्या. शिक्षिका म्हणून अनेकांना घडविणार्‍या सविताताईंनी पतीच्या ध्येयवादी पत्रकारितेसाठी तितक्याच समर्थपणे साथ दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -