घरमुंबई...यामुळे तीन दशकानंतर जाणवली 'या' गावात पाणी टंचाई

…यामुळे तीन दशकानंतर जाणवली ‘या’ गावात पाणी टंचाई

Subscribe

सध्या मुरबाड तालुक्यातील धसई या गावातील नागरिकांना भीषण टंचाई भासत आहे.

नोटाबंदीनंतर त्याच्या समर्थनार्थ देशातील पहिले कॅशलेस गाव असा दावा करण्यात आलेल्या, परंतु प्रत्यक्षात रोकडविरहीत व्यवहारांचा बोजवारा उडालेल्या मुरबाड तालुक्यातील धसई या गावातील देवधर धरण गळतीमुळे कोरडे झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बारा महिने पाण्याचा सुकाळ असणाऱ्या या महसुली गावाला सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन दशकात धसई गावात कधीच पाणी टंचाई भेडसावली नव्हती. मात्र आता या गावात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

३२ वर्षांपूर्वी बांधले होते धरण

मुरबाड तालुक्यातील धसई हे राज्याचे माजी महसुलमंत्री शांताराम घोलप यांचे गाव आहे. या परिसरातील शेतीसाठी ३२ वर्षांपूर्वी या गावाच्या वेशीबाहेर लघु पाटबंधारे विभागाने देवधर धरण बांधले. या धरणामुळे परिसरातील तब्बल ६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जलसंधारण होत असल्याने गावातील विहीरींना बारमाही मुबलक पाणी मिळत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी धरणातून कालव्यात पाणी सोडणाऱ्या विहीरीचे बांधकाम ढासळले आणि धरणाला मोठे भगदाड पडले. त्यामुळे धरणातून लाखो लिटर पाणी अक्षरश: वाहून गेले आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले नाही. शिवाय गावातील विहीरीही आटल्या आहेत. त्यामुळे खायला अन्न नाही आणि पिण्यासाठी पाणीही नाही, अशी धसईकरांची सध्या अवस्था आहे.

- Advertisement -

मुरबाडमधील धसईकरांवर भीषण पाणी टंचाईचे संकट

धरण बांधल्यानंतर धसई गावात कधीच पाणी टंचाई भेडसावली नव्हती. यंदा मात्र प्रथमच गावातील महिलांना पाण्यासाठी विहीरांचा तळ खरडावा लागत आहे.  – मानसी विशे, गावातील गृहिणी

विहीरी आटल्या त्यामुळे यंदा प्रथमच पाणी विकत आणण्याची वेळ धसईकरांवर आली आहे. गेल्या कित्येक वर्षात धसईत पाणी टंचाई नव्हती. मात्र धरणाला गळती लागल्याने आमचा गाव कोरडा झाला आहे. गेली दोन वर्षे धरणातून पाणी गळती सुरू आहे. सध्या पाण्याचा थेंब अन् थेंब महत्त्वाचा असल्याने तातडीने विहीरीची दुरूस्ती होणे अपेक्षित होते. मात्र पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप धसईकर करीत आहेत.  – दत्तात्रय घोलप, नागरिक

- Advertisement -

धसई धरणातील नादुरूस्त विहीरीचे काम सध्या सुरू असून मे अखेरपर्यंत ते पूर्ण होईल. त्यामुळे येत्या पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरून धसईकरांचा पाणी प्रश्न सुटेल.  – सुधीर सावंत, कनिष्ठ अभियंता, लघु पाटबंधारे विभाग


वाचा –  भिवंडीत भीषण पाणी टंचाई

वाचा – ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -