घरमुंबईइंग्रजी शिकण्यासाठी शाळेची मधली सुट्टी सत्कारणी

इंग्रजी शिकण्यासाठी शाळेची मधली सुट्टी सत्कारणी

Subscribe

- सायन येथील शाळेचा आगळा वेगळा उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी शाळेची मधली सुट्टी म्हणजे एकमेकांचा डबा खाणे आणि धांगडधिंगा-मस्ती! पण सायन येथील डी.एस. हायस्कूलमधील मुले याला अपवाद ठरली आहेत. मधल्या सुट्टीच्या अर्ध्या तासात ही मुले देश-विदेशातील गोष्टींची इंग्रजी पुस्तके वाचण्यासाठी धडपडतात. त्याचे श्रेय जाते शाळेत चालवल्या जाणार्‍या स्पोकन इंग्रजीच्या उपक्रमाला.

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्‍या डी.एस. हायस्कूलमध्ये गेल्या चार वर्षांपासून स्पोकन इंग्रजीचा विशेष वर्ग नियमितपणे राबवला जात आहे. शाळेने त्यासाठी पाच तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेतील संवाद सुधारावे, यासाठी हे शिक्षक नवनवे प्रयोग करत असतात. २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात शाळेच्या विश्वस्तांच्या सहकार्याने स्पोकन इंग्रजीच्या खोलीत ३५० पुस्तकांची एक लहानशी लायब्ररी बनवण्यात आली.

- Advertisement -

या लायब्ररीत लहान मुलांना आवडतील व समजतील अशी इंग्रजी भाषेतील गोष्टींची तसेच चित्रकथांची पुस्तके, कॉमिक्स कथा यांचा समावेश आहे. मुलांनी मधल्या सुट्टीत किंवा वेळ मिळेल तेव्हा ही पुस्तके वाचायला मिळावीत, असे आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला इतका प्रतिसाद लाभू लागला की, स्पोकन इंग्रजीचा वर्गच त्यासाठी कमी पडू लागला. याविषयी अधिक माहिती देताना शाळेतील स्पोकन इंग्रजीचे शिक्षक राकेश दमानिया यांनी सांगितले की, ‘ही पुस्तके निवडताना आम्ही खास काळजी घेतली आहे. पुस्तके मुलांच्या आकलन पातळीशी सुसंगत असावीत, त्यांची भाषा सोपी असावी, भरपूर चित्र असलेली पुस्तके मुलांना आकर्षित करतात म्हणून तशी पुस्तके आणि भरपूर सामान्य ज्ञान देणारी असावीत.

दररोज दुपारी तीन वाजता मधली सुट्टी झाली की, मुले-मुली अक्षरशः धावत या स्पोकन इंग्रजीच्या वर्गात येतात आणि पुढचा अर्धा तास आवडेल ती पुस्तके वाचतात. वर्गातील खुर्चीवर जागा मिळाली नाही तर मुले सरळ जमिनीवर बसतात, पण पुस्तक वाचणारच असा त्यांचा आग्रह असतो, अशी माहिती स्पोकन इंग्रजीच्या शिक्षिका अमिता आचरेकर यांनी दिली. शाळेमधील बहुतेक विद्यार्थी हे धारावी, सायन, चुनाभट्टी येथील कष्टकरी कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांच्या पालकांना गोष्टीची पुस्तके विकत घेणे, परवडणारे नसावे, पण शाळेतील मुलांमध्ये वाचनाची प्रचंड गोडी आहे, ती सतत वाढत आहे. मुलांचा हा प्रतिसाद पाहून आम्ही इंग्रजी गोष्टींची आणखी पुस्तके मागवणार आहोत, असे शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -