रस्ते सुरक्षा सप्ताहावर स्कूलबस संघटनेचा बहिष्कार

आरटीओकडून कार्यक्रमामध्ये सहभागी न केल्याने नाराजी

रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांची सर्वांना माहिती व्हावी यासाठी विभागीय परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) 13 जानेवारीपासून रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरूवात करण्यात आली. सप्ताहानिमित्त वाहनचालक व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुखरूप शाळेत व घरी पोहचवणार्‍या शाळा बसचालकांसाठी मात्र आरटीओकडून कोणताच कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. तसेच स्कूल बस असोसिएशनलाही यामध्ये सहभागी केले नाही. त्यामुळे आरटीओकडून मिळालेल्या दुय्यम वागणुकीविरोधात नाराजी व्यक्त करत स्कूल बस असोसिएशनने रस्ते सुरक्षा सप्ताहावरच बहिष्कार टाकला आहे.

13 ते 18 जानेवारीदरम्यान चालणार्‍या रस्ते सुरक्षा सप्ताहनिमित्त नागरिक व वाहन चालकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आरटीओकडून विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना गुलाबाचे फुल देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना देणे, एनएसएस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कॉलेजमध्ये व्याख्याने, बाईक रॅली यांचा समावेश आहे. जागरुकता मोहीम राबवण्यासाठी आरटीओकडून शाळकरी मुलांची मदत घेण्यात येणार आहे. मात्र स्कूलबस सुरक्षित असून, विद्यार्थी सुरक्षित हातात आहेत असे सांगत परिवहन आयुक्तांनी स्कूलबस चालकांना सुरक्षा सप्ताहापासून दूर ठेवले.

तसेच शाळकरी मुलांना सुखरूप घरी व शाळेत पोहचवण्याची जबाबदारी असलेल्या शाळा बसचालक व सहाय्यक महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर, ट्राफिक ट्रेनिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना नेऊन तेथील रहदारीचे नियम समजावून सांगणे, पालक व बसचालकांमध्ये परिसंवाद, विद्यार्थ्यांसाठी शिबिर यापैकी कोणत्याच कार्यक्रमाचे आरटीओकडून नियोजन करण्यात आले नाही. शालेय बसचालकांकडून काही चुक झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या कामाची सविस्तर माहिती व ड्रायव्हिंगसंदर्भात त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे असतानाही आरटीओकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने रस्ते सुरक्षा सप्ताहावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

रस्ते सुरक्षा सप्ताहासाठी बसचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली होती. तसेच पालक शिक्षक संघटनांसोबत आम्ही चर्चासत्र व परिसंवादही ठेवले होते. परंतु आरटीओकडून त्याबाबत अपेक्षाभंग करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही यावर बहिष्कार टाकत आहोत.
– अनिल गर्ग, अध्यक्ष,स्कूल बस असोसिएशन