पीएमसी घोटाळ्याचा आणखी एक बळी

पीएमसी बँकेच्याविरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात ओशिवरा येथील एका ५१ वर्षीय खातेधारकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा मुलुंड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Mumbai
pmc bank
पीएमसी बँक

आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनं, मूक मोर्चा अशा विविध मार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत आहेत. अशाच एका आंदोलनात सहभागी झालेल्या ओशिवरा येथील ५१ वर्षीय खातेधारकाचा आंदोलनानंतर मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका खातेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या फत्तोमल पंजाबी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुलुंडचे रहिवासी असलेल्या पंजाबी यांनी दुपारी अखेरचा श्वास घेतला आहे.

पीएमसी घोटाळ्याचा पहिला बळी

याआधी ओशिवरामधील ५१ वर्षीय संजय गुलाटींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पीएमसीच्या ओशिवरा येथील शाखेत संजय गुलाटी यांच्या कुटुंबीयांचे एकूण ९० लाख रुपये होते. सोसायटीचे सचिव यतिंद्र पाल म्हणाले की, “संजय आणि त्यांचे वडील सी. एल. गुलाटी हे जेट एअरवेज मध्ये काम करत होते. संजय यांनी नोकरी गमावल्यानंतर आता त्यांनी त्यांची बचत सुद्धा गमावली आहे. थायरॉइड शिवाय त्यांना तब्येतीची कोणतीही तक्रार नव्हती. सोमवारी पीएमसीच्या खातेधारकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काढलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. या आंदोलनात त्यांनी अनेकांना रडताना पाहिले. संध्याकाळी ३.३० वाजता संजय घरी आले आणि झोपले. त्यानंतर जवळपास ४.४५ वाजता त्यांनी आपल्या पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. जेवताना अचानक खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला.”

त्यांनी पुढे सांगितले की, “संजय यांची पत्नी घरी एकटीच होती. त्यामुळे त्यांनी मला फोन केला. त्यानंतर आम्ही संजय यांना कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मी पोलिसांना फोन केला.”


हेही वाचा – पीएमसीच्या ग्राहकांना दिलासा; २५ वरून ४० हजार रुपयांची मर्यादा वाढवली