घरमुंबईअन्यथा ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार

अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार

Subscribe

फटाक्याच्या अवैध साठ्यविरोधात कोपरीकर आक्रमक

ठाण्यातील कोपरी भागात स्टेशनलगत असलेल्या बाजार परिसरातच फटाक्यांची मोठी दुकाने थाटण्यात आली आहेत. होलसेल भावात विक्री होत असल्याने ठाण्यातूनच नव्हेतर कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवलीसह, मुलुंड, भांडुप भागातून अनेकजण फटाके खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात. सद्यस्थितीत तेथे सुमारे 18 फटाक्याची मोठी दुकाने आहेत. या दुकानांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र त्यापैकी एकाही विक्रेत्याकडे पालिकेचा रितसर परवाना नाही किंवा अग्निशमन दलाचा ना हरकत परवाना नाही.

शिवाय या ठिकाणी फटाक्याचा साठा अनधिकृतरित्या करण्यात आलेला आहे. याविरोधात अनेकवेळा संबंधित आस्थापनांना निवेदने देऊनही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवणार्‍या या दुकानांविरोधात येथील रहिवाशी मिलिंद कुवळेकर यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. स्थानिक प्रशासन याविरोधात कोणतीही कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाच्या आवारात आत्मदहनाचा इशारा कुवळेकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

रहिवासी क्षेत्रात अवैध दुकाने उभारली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश शासनाला मुंबई उच्च न्यायालयामार्फत देण्यात आले आहेत. अवैध फटाके विक्रीविरुद्धच्या कारवाईचे काम एक दिवसाचे नाही तर ते सातत्याने चालले पाहिजे, फटाक्यांमुळे होणारी जीवितहानी ही गंभीर बाब असून, निवासी वसाहतीत अवैध दुकाने आणि साठे करणार्‍यांचे केवळ परवाने रद्द करून चालणार नाहीतर संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिले आहेत. मात्र याकडे ठाण्यातील संबंधित प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. विस्फोटक अधिनियम 1884 व त्याअतंर्गत तयार केलेल विस्फोटक नियम 2008 मधील विविध प्रतिबंध आणि नियम यांची अंमलबजावणी फटाका विक्री लायसन्सधारकांनी करणे आवश्यक आहे.

ज्यामध्ये फटाका विक्रेत्यांची दुकाने निवासी इमारतीमध्ये येत असल्यास त्यांना परवाना देण्यात येऊ नये. तसेच इमारतीमधील किंवा इमारतीच्या तळमजल्यातील दुकानांमधून फटाक्याची विक्री करण्यात येऊ नये. दोन फटाकाच्या दुकानांमध्ये किमान 15 मीटर अंतर असणे आवश्यक आहे. फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये, पटांगणामध्ये असणे आवश्यक आहे. जेणेकरून एखादी अनुचित घटना घडल्यास कमीतकमी नुकसान होईल.

- Advertisement -

निवासी इमारतीमध्ये गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास कोणत्याही प्राधिकरणाने परवानगी देऊ नये असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र या सर्व नियमांची पायमल्ली करीत कोपरीपरिसरातील फटाक्याची दुकाने सर्रासपणे सुरु आहेत. अग्निसुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसताना शासन आणि प्रशासनाच्या अर्थपूर्ण सहकार्याने ही दुकाने खुलेआम सुरु आहेत. याविरोधात लवकरच आंदोलन करण्याचा इशारा कुवळेकर यांनी दिला आहे.

माझे किराणा मालाचे दुकान आहे. माझ्या बाजूलाच सुरेश आछरा यांनी फटाक्याचे दुकान थाटले आहे. त्यांना परवाना मिळू नये म्हणून मी 2008 साली मुख्य स्फोटक नियंत्रण विभागात अर्ज केला आहे. अर्जावर कारवाई प्रलंबित आहे. ते दुकान अद्यापही सुरू आहे. भविष्यात काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?
– अमरलाल बजाज, दुकानदार कोपरीबाजार

मी मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे. न्यायालयाने निर्देशित केलेल्या एकाही अटीचे पालन होत नाही. याबद्दल सर्व माहिती मिळवली असून या दुकानदारांना स्थानिक पोलीस प्रशासन पाठीशी घालीत आहे. त्याविरोधात पोलीस परवाना शाखा आणि कोपरी पोलीस स्टेशनच्या विरोधात येत्या 24 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात मी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर येणार्‍या 30 ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मी दिलेला आहे.
– मिलिंद कुवळेकर, याचिकाकर्ता

हा विषय खरेतर कमिशनर कार्यालयाशी संबंधित आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करू शकत नाही. मात्र कोपरी परिसरातील दुकानदारांकडे संबंधित विभागाचा परवाना असल्याशिवाय ती सुरु राहू शकत नाहीत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे कमी अधिक साठा होत असेल मात्र याबाबत काही तक्रार आल्यास आम्ही नक्कीच कारवाई करू
– श्रीमती के.एन.गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -