घरमुंबईविक्रेत्यांना निकृष्ट दर्जाचे स्टॉल्स

विक्रेत्यांना निकृष्ट दर्जाचे स्टॉल्स

Subscribe

स्टॉल्सधारकांमध्ये संतापाचे वातावरण

शिवाजी पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये पुस्तके, कॅलेंडर, छायाचित्र, लॉकेट, टी-शर्ट यांसारख्या विविध वस्तूंची विक्री करण्यात येते. मात्र हे स्टॉल्स फारच निकृष्ट दर्जाचे असून, ठेकेदारांकडून स्टॉल्सधारकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप स्टॉल्सधारकांकडून करण्यात येत आहे. स्टॉल्ससाठी वापरलेले बांबू व पडदे चांगल्या दर्जाचे नसून, गर्दी वाढल्यावर त्याचा टिकाव लागण्याची शक्यता नाही. तसेच स्टॉल्सच्या परिसरात कार्पेट न टाकल्याने धूरळा उडून विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू खराब होत असल्याने नुकसान होत असल्याचे सांगत स्टॉल्सधारकांनी संताप व्यक्त केला.

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणार्‍या भीम अनुयायींच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था शिवाजी पार्कमध्ये करण्यात येते. त्याचबरोबरच यावेळी भीम अनुयायींना खरेदी करता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिकेकडून स्टॉल्सही लावण्यात येतात. या स्टॉल्ससाठी मुंबई महापालिका स्टॉल्सधारकांकडून फक्त 118 रुपये घेते. तर स्टॉल उभारणारा ठेकेदार प्रत्येक स्टॉलसाठी तीन हजार रुपये घेतो. लाखोच्या संख्येंने चैत्यभूमीवर येणारे भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येत असल्याने स्टॉल्सधारक ही रक्कम देण्यास तयार होत असतात. परंतु ठेकेदाराकडून उभारण्यात येत असलेले स्टॉल्स हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्टॉल्सधारकांकडून करण्यात येत आहे. स्टॉलसाठी वापरलेले बांबू व पडदे हे चांगल्या दर्जाचे नाहीत. काही स्टॉलचे बांबू हे व्यवस्थित बांधण्यात आलेले नसून ते हलत आहेत. तर काही बांबू हे पाहताच निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहेत. स्टॉलसाठी वापरलेले पडदे हे व्यवस्थित बांधलेले नाहीत. अनेक ठिकाणी पडदे फाटलेले आहेत. तर अनेक ठिकाणी पडदे व्यवस्थित शिवण्यात आलेले नसल्याचे स्टॉल्सधारकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पालिकेकडे स्टॉलसाठी नोंद केल्यानंतर आम्हाला दिलेल्या पासवर स्टॉल क्रमांक दिला होता. परंतु ठेकेदाराने उभारलेल्या एकाही स्टॉलवर नंबर टाकलेला नाही. त्यामुळे नेमका कोणता स्टॉल आमचा आहे हे कळण्यास मार्ग नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीला एक स्टॉल देणे अपेक्षित असताना ठेकेदाराने आपल्या मर्जीतील व्यक्तीला प्रवेशद्वाराजवळ आठ ते दहा स्टॉल्स दिले आहेत, असा आरोप स्टॉल्सधारक व नागपूर येथील बहुजन साहित्य प्रसार केंद्राचे प्रकाशक सुजीत मुरमाडे यांनी केला. मर्जीतील व्यक्तींना प्रवेशद्वारावर स्टॉल दिल्याने याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. आम्ही पैसे भरूनही आमचा व्यवसाय होणार नसल्याने आमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी माहितीही मुरमाडे यांनी दिली. बेस्टकडून लावण्यात आलेली डीपी ही स्टॉललाच लावण्याने एखादी दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑक्टोबरला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात जमा होतात. यावेळी नागपूर महापालिकेकडून उत्तम दर्जाचे स्टॉल देण्यात येतात. त्या तुलनेत मुंबई महापालिकेने दिलेले स्टॉल फारच निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मुरमाडे यांनी केला.

महापालिकेने ठेकेदाराच्या माध्यमातून बांधलेल्या या स्टॉलमध्ये कार्पेट टाकणे गरजेचे होते. परंतु कार्पेट न टाकल्याने मैदानातील धुरळा मोठ्या प्रमाणात उडत आहे. त्यामुळे विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू खराब होत आहेत. तसेच विद्युत रोषणाईची व्यवस्थाही व्यवस्थित केली नसल्याने त्याचा परिणाम खरेदीवर होण्याची शक्यता असल्याचा आरोप स्टॉलधारक गौतम भगत यांनी केला. या संदर्भात महापालिकेचे सह जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले.

- Advertisement -

ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर महापालिकेने अंकुश ठेवणे अपेक्षित आहे. परंतु पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पालिकेने ऑनलाईन स्टॉल वाटप केल्यास ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यास मदत होऊ शकते व एखाद्या सामान्य स्टॉलधारकालाही प्रवेशद्वारासमोर स्टॉल मिळू शकतो.
– सुजित मुरमाडे, प्रकाशक, बहुजन साहित्य प्रसार केंद्र

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -