घरमुंबईवरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धमकावून पाच महिला पोलिसांना मारहाण

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धमकावून पाच महिला पोलिसांना मारहाण

Subscribe

वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच धमकावून पाच महिला पोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आंबोली पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी रेश्मा मलिक या महिलेविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप तिला अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.सावनी सुबोध शिगवन ही महिला पोलीस शिपाई सध्या आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शनिवारी त्या दिवसपाळीवर कर्तव्यावर हजर होत्या. दुपारी अडीच वाजता रेश्मा मलिक नावाची एक महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिथे पोलीस निरीक्षक सरगर, सावनी शिगवन आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई ज्योती पाडेकर या उपस्थित होत्या. गायकवाड यांनी तिची विचारणा केली असता तिने आपण एक लेखी तक्रार केली आहे, या तक्रारीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांच्यासमोरच तुम्ही सगळे चोर आहात, तुम्ही गुन्हेगारांना पाळता, तुमच्यामुळे माझी प्रकृती बिघडली आहे असे बोलून तुम्हाला कोणालाही मी सोडणार नाही,अशी धमकी देऊ लागली.

अश्लील शिवीगाळ
यावेळी भारत गायकवाड यांच्यासह इतर पोलिसांनी तिला शांत राहण्यास सांगितले. मात्र तिने जोरजोरात पोलिसांवरच आरोप करुन त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली. यावेळी या रेश्मा आणि ज्योती यांनी तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी तिने ज्योती पाडेकर यांना जोरात लाथेने मारहाण केली तर रेश्मा यांच्या कानशिलात लगावली होती. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी तिने अन्य तीन पोलीस शिपाई फापाळे, वाघमारे आणि बच्छाव यांनाही शिवीगाळ करुन मारहाण सुरुवात केली होती. वाघमारे यांचे केस ओढले तर बच्छाव यांच्या पोटावर आणि पायाला जोरात लाथा मारल्या. तसेच त्यांच्या मदतीसाठी आलेल्या फापाळे यांना धक्काबुक्की केली होती.

- Advertisement -

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना धमकी
तिला सर्व पोलीस आवरण्याचा तसेच शांत राहण्याची विनंती करीत होते, मात्र ती कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यावेळी तिने पुन्हा भारत गायकवाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा ताबा घेऊन तिला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तिथेही तिने डॉक्टरासमोरच प्रचंड धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सावनी शिगवन यांच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसांनी रेश्मा मलिकविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी मारामारी, शिवीगाळ करुन धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

मानसिक स्थिती बिघडलेली
या गुन्ह्यांत तिला अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. पोलीस तपासात रेश्मा हिने विविध पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे तक्रारी केल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली नाहीतर तर ती आक्रमक होते, तिची मानसिक स्थिती ठिक नाही आहे. त्यामुळे तिला उपचारार्थ कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तिथे उपचार घेण्यास नकार देत तिथेही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने तिथे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -