घरमुंबईनाला तुंबलाय? ‘अॅप’वरून कळवा

नाला तुंबलाय? ‘अॅप’वरून कळवा

Subscribe

नालेसफाईबाबतच्या तक्रारींवर पालिकेची सोशल शक्कल

मुंबईतील नालेसफाईच्या कामांबाबत खुद्द महापौरांनी असमाधान व्यक्त केल्यानंतर तसेच प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या टिकेची दखल घेत महापालिकेने नालेसफाईच्या कामांसाठी स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप नागरिकांसाठी बनवण्यात आले असून यामध्ये नागरिकांनी आसपासचा नाला साफ झाला नसेल तर त्याचे छायाचित्र या अ‍ॅपवर अपलोड केल्यास काही तासांमध्ये त्याची सत्यता पडताळून साफसफाईचे काम हाती घेतले जाणार आहे.

मुंबईतील पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्‍या ७० टक्के नालेसफाई कामाच्या जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, सफाईचे काम पूर्ण होवून महापालिकेतील सत्ताधारी पक्ष, तसेच विरोधक समाधानी नाहीत. महापालिकेचे अधिकारी समाधानकारक सफाई होत असल्याचा दावा करत आहे. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही सफाईचे काम समाधानकारक झाल्याचा दावा केला आहे. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये गाळ न काढलेल्या आणि भरलेल्या नाल्यांची छायाचित्र प्रकाशित केली जात आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांमध्ये जनतेचा सहभाग अ‍ॅपद्वारे नोंदवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नागरी तक्रारींसाठी अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपवर मुंबईतील सर्व नालेसफाईचे फोटो टाकण्यात येणार आहे. परंतु याबरोबरच जर नागरिकांना आपल्या विभागातील नाला साफ झाला नाही,असे दिसून येत असेल तर त्यांनी त्या नाल्याचा फोटो काढून या अ‍ॅपवर टाकावा. जेणेकरून त्या नाल्याची सफाई संबंधित विभागाला सूचना देवून नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून करून घेण्यात येईल,असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. या अ‍ॅपचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते लवकरच नागरिकांसाठी खुले करून दिले जाणार आहे.

- Advertisement -

संबंधित तक्रार व छायाचित्र हे ‘जागतिक स्थितीमापक प्रणाली’ अर्थात ‘ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम’ला (जीपीएस) जोडलेले असेल. परिणामी, तक्रार ज्याबाबत आहेत त्याविषयीचे निश्चित ठिकाण शोधणे सोपे होणार आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिलेल्या सुचनेनुसार हे अ‍ॅप विकसित करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा विसर

मुंबई महापालिकेत यापूर्वी खड्डयांचा शोध घेण्यासाठी पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. प्रोबिटी कंपनीवर याची जबाबदारी टाकण्यात आली होती. या प्रणालीमुळे खड्ड्यांच्या समस्येवर मात करता आली होती. परंतु अजोय मेहता यांनी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर या कंपनीला हद्दपार केले. परंतु या कंपनीमुळे मुंबईतील खड्डयांची समस्या दूर करण्यात यश आले होते. सध्या महापालिकेच्यावतीने अ‍ॅप विकसित करून खड्डयांची छायाचित्र पाठवण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी नागरिकांचा सहभाग कमी झाला आहे. त्यामुळे खासगी कंपनीवर जबाबदारी टाकल्यास खर्‍या अर्थाने नागरिकांचा सहभाग वाढलेला पाहायला मिळाला आहे. महापालिकेचे अधिकारी आपल्या अ‍ॅपवर विशेष तक्रारी नोंदवत नसल्याने खड्डयांच्या तक्रारींची संख्या कमी झाल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -