घरमनोरंजनsushant suicide case: रियाच्या जामीन याचिकेवर उद्या होणार सुनावणी

sushant suicide case: रियाच्या जामीन याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Subscribe

मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीने मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आरोपींना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे रियासोबत त्यांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

एनसीबीकडून आरोपांखाली रियालाही अटक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो  (NCB) ने रियाला अटक केली. या आधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे. याचसंदर्भात गेले ३ दिवस रियाची कसून चौकशी सुरू होती. सबळ पुरावे हाती लागल्यावरच NCB ने रियाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयानं रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्जही फेटाळून लावला.

- Advertisement -

त्याविरोधात रियाच्यावतीने अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र आपण निर्दोष असून आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. यात आपल्याला गुंतवण्यात आले असून तपासयंत्रणेकडून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडण्यात आल्याचंही या याचिकेतून नमूद करण्यात आले आहे.


ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रिया चक्रवर्तीला अखेर NCB कडून अटक

असे म्हटले आहे याचिकेत…

मिळालेल्या माहितीनुसार, रियाने ड्रग्सचे सेवन केले असले तरीही तिने ड्रग्स रॅकेटला आर्थिक मदत केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ड्रग्स सेवन हा जामीन पात्र गुन्हा आहे. तीन दिवस रियाची एनसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरू असताना तिची उलट तपासणी करणारे अधिकारी हे पुरुष होते. कायद्यानुसार तिथे महिला अधिकारी उपस्थित असणे अनिवार्य असूनही एकही महिला अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून रियाला लैंगिक अत्याचाराच्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे तिला जर कोठडी मिळाली तर तिच्या जीवाला धोका संभवू शकतो असं या याचिकेतून म्हटले आहे. तसेच रिया तपासकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहे. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली असून याचिकेवर गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -