देह व्यापार करणाऱ्या महिलांनी सुरू केला ‘वेस्ट’ पासून ‘बेस्ट’ व्यवसाय

bhiwandi sex worker doing business

भिवंडी शहरातील देह व्यापार करणारी बदनाम वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडी येथे ‘श्री साई सेवा संस्थे’च्या माध्यमातून टाकाऊ कचऱ्यापासून विविध दिवे, लॅम्प, शोभिवंत आभूषणे सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून देह व्यापार करणाऱ्या महिलांनी व्यवसाय सुरू केला असून ‘इको लाईट स्टुडिओ’ या महिला सक्षमीकरण केंद्राचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी महिला सक्षमीकरण केंद्राच्या श्रीमती खाडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कांबळे, संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्वाती सिंग खान, कचऱ्यापासून शोभिवंत वस्तू निर्मितीचा ध्यास घेतलेले डॉ. बिपीन देसाई दाम्पत्य यांची उपस्थिती होती.

“महिला या जन्मापासून वेदना सहन करत असतात. मग त्या उच्चपदस्थ अधिकारी असल्या तरी त्यांना महिला म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागते, अशा परिस्थितीत श्री साई सेवा संस्थेने देह व्यापार करणाऱ्या महिलांसाठी काम करून न थांबता या महिलांना त्या नरक यातना सहन कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेतून बाहेर काढून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. या महिलांना आता स्वावलंबी बनून समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करून देण्याचे कार्य उभे केले आहे, ते कौतुकास पात्र असून अशा कार्यासाठी शासकीय पातळीवर जी काही मदत करणे शक्य असेल ती मदत देऊ”, असे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी दिले.

महिलांनी वापरून फेकून दिलेल्या कॉफी भुकटी पासून विविध आकाराचे आभूषणे आणि आकर्षक दिवे बनविण्याचे प्रशिक्षण डॉ. बिपीन देसाई या दाम्पत्यांनी दिले. येथे सध्या प्राथमिक स्तरावर महिलांकडून
रंगरंगोटी आणि सजावट केली जात असून हे उत्पादन लवकरच विविध संस्थांच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्वाती सिंग खान यांनी दिली आहे. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.