१९ वर्षांच्या ब्राझिलियन तरुणीवर लैंगिक अत्याचार

कफ परेड रहिवाशी असोशिएशनच्या अध्यक्षाला अटक

Mumbai
arrested
अटक

शीपपेयातून गुंगीचे औषध देऊन एका 19 वर्षांच्या ब्राझील देशाच्या नागरिक असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना कफ परेड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंद होताच सोमवारी कफ परेड रहिवाशी असोशिएशनचा अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. पद्माकर नांदेकर असे या 52 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

19 वर्षांची पिडीत तरुणी ही ब्राझिल देशाची नागरिक असून ती गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यांत भारतात आली. सध्या ती कफ परेड परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वीच तिची पद्माकर नांदेकर याच्याशी ओळख झाली होती. पद्माकर हा कफ परेड रहिवाशी असोशिएशनचा अध्यक्ष असून परिसरात तो एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून परिचित आहे. एप्रिल महिन्यात त्याने पिडीत तरुणीला जेवणाचे आमंत्रण दिले होते. पद्माकर हा तिच्या परिचित असल्याने तिनेही त्याला होकार दिला होता. 15 एप्रिलला तो तिला त्याच्या घरी न नेता एका नामांकित हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्ये त्याने मद्यप्राशन केले. तसेच त्या तरुणीला शीतपेयातून त्याने गुंगीचे औषध दिले. काही वेळाने तिला चक्कर आल्याने त्याने तिला हॉटेलच्या एका रुममध्ये नेले. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

दुसर्‍या दिवशी हा प्रकार तिच्या निदर्शनास येताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. यावेळी त्याने तिला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर गंभीर परिणाम होतील, असे धमकावले. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. नंतर तिने नांदेकरविरुद्ध कफ परेड पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अलीकडेच कफ परेड पोलिसांनी पद्माकर नांदेकरविरुद्ध बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिडीत तरुणीची मेडीकल झाली असून लवकरच आरोपीचीही मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here