तेजस्वीने एकटे लढूनही चांगली लढत दिली – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे अनुभवाने कमी असतानाही त्यांनी इतर नेत्यांविरोधात चांगली लढत दिली, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेजस्वी यादव यांचे तोंडभरून कौतुक केले. अनुभवाने आणि वयाने कमी असतानाही तेजस्वी यादव यांचे हे यश म्हणजे राजकारणात येणाऱ्या नव्या तरूणांना प्रेरणा मिळेल असेच आहे. बिहार विधानसभेचा निवडणुकीचा कल हळूहळू जाहीर होत असतानाच तेजस्वी यादव आणि कॉंग्रेस आघाडीने शंभरीपार केली असून विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि भाजपने आतापर्यंत १२४ जागांवर आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांवरील मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली असून रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहील असे केंद्रीय निवडणुक आयोगाने म्हटले आहे.

तेजस्वी यादवांविरोधात अनेक अनुभवी नेते होते, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह केंद्रातील अर्धा डझनहून अधिक नेते भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाच्या प्रचारासाठी रणांगणात होते. असे असतानाही तेजस्वी यादव यासर्वांविरोधात एकटे लढले आणि त्यांना मिळालेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे असेही पवार म्हणाले.
महत्वाच्या सर्वच एक्झिट पोलने राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता मात्र सध्याचा ट्रेंड पाहता जनता दल युनायटेड आणि भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. बहुमतासाठी १२२ जागांवर विजयी होणे आवश्यक असून रात्री उशिरापर्यंत बिहारच्या सर्व जागांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसला केवळ २० जागांवर आघाडी असून भाजप आणि राष्ट्रीय जनता दलमध्ये नंबर एक आणि नंबर दोन या स्थानासाठी काटेकी टक्कर आहे.