बेरजेच्या राजकारणावर आता राष्ट्रवादीची डाळ शिजणार नाही!

Mumbai
ncp chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत तरुण नेत्याला लाजवेल अशारितीने राज्य ढवळून काढले. ऐंशीच्या घरात आलेल्या पवारांचा या वयातील उत्साह आणि इच्छाशक्ती निश्चितच राजकारणात आपली कारकीर्द घडवू पाहणार्‍या युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. मात्र, त्यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसची डाळ शिजणार नाही. 2019 लोकसभा निवडणुकीचे आकडे तसे दाखवत आहेत. काँग्रेसप्रमाणे जातीपाती, गरिबी हटाव आणि त्यांचे स्वतःचे असे मराठा कार्ड घड्याळाचे काटे पुढे सरकवू शकणार नाही. 5 वर्षांपूर्वी त्यांना 4 जागा मिळाल्या होत्या, यावेळी यात एका जागेची भर पडली असली तरी पश्चिम महाराष्ट्राच्या त्यांच्या गडाला बसलेले हादरे हे पुढे धोका असल्याचे स्पष्टपणे दाखवत आहेत.

मराठा, मुस्लीम, दलित, कुणबी आणि धनगर अशा जातीपातीच्या गाठी मारत त्या जातीचा उमेदवार उभा करून आणि धर्मनिरपेक्षतेचा मोठा आव आणून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. नवीन पिढी मग ती शहरातील असो की ग्रामीण भागातील तिला आता नवा चेहरा आणि नवी दिशा देणारा चेहरा हवा आहे. साखर कारखाने, सहकारी बँका, दूध संघ, शेतकरी सहकारी संघ ताब्यात घेऊन राजकारण करण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेत. ते तुम्हाला ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पुरत्या फायदेशीर ठरतील, पण त्याचा मोठा फायदा विधानसभा आणि लोकसभेत यापुढे दिसणार नाही. आता सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारण कसे करायचे, याचे तंत्र आता भाजप आणि शिवसेनाही शिकली आहे. सहकाराच्या जाळ्यातून आपले संस्थान उभे करायचे आणि संस्थानिक होऊन सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पुन्हा सत्ता हे गेल्या सहा दशकातील निवडणुकांचे डावपेच ना राष्ट्रवादीला, ना काँग्रेसला खेळता येणार. संस्थान नव्हे तर केडर बेस पक्ष बनवल्याशिवाय तरणोपाय नाही. याला काही वर्षे जातील, पण भविष्य अंधारमय होणार नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमक चेहरा नाही. ते अरे आवाज कुणाचा, हे कोणाला सांगणार ? अशी हेटाळणीही झाली. पण, शेवटचा श्वास असेपर्यंत शिवसेनेला मानणारा आणि काडीचीही अपेक्षा नसणारा शिवसैनिक बाळासाहेबांनी तयार केला आणि स्वतः पवारही हीच शिवसेनेची मोठी ताकद असल्याचे मान्य करतात. मात्र, आपला पक्ष तशा पद्धतीने ‘मास बेस’ करण्यात त्यांना अजूनही यश आलेले नाही. विदर्भ, मराठवाड्यात फिरताना ते कायम जाणवले आहे. पवार हे खरोखर जाणता राजा असते तर त्यांनी हे भाग मागास ठेवले नसते आणि फक्त बारामतीसह संस्थानिकांचे गड सुजलाम सुफलाम राहतील यावर भर दिला नसता, असे खेडोपाड्याची जनता सांगत आहे. आज दुष्काळाच्या नावाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कितीही गळे काढले तरी लोकांना ते मगरीचे अश्रू वाटतात आणि हेच सारे मूक फॅक्टर राष्ट्रवादीला आपली म्हणायला तयार नाहीत आणि हेच मतदानातून दिसून आले आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे या जिंकल्या असल्या तरी त्यांच्या विजयातील मतांचा फरक खूप कमी झाला आहे. बारामतीचा काही भाग आपल्याला पाणीदार दिसत असला तरी अर्धा भाग पाण्यासाठी धडपडतोय, हे चित्र फारसे आशादायक नाही. काँग्रेस शेवटच्या घटका मोजतेय हे लक्षात आल्यानंतर भाजपने यावेळी आपल्या निवडणुकीची रणनीती बदलताना शरद पवार आणि पश्चिम महाराष्ट्र आपल्या टार्गेटवर आणले. नरेंद्र मोदींच्या सभातून ते प्रकर्षाने दिसून आले. एका बाजूने पवार यांना टीकेचे लक्ष्य करायचे आणि दुसर्‍या बाजूने त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानावर साम, दाम, दंड, भेद या नीतीने हल्लाबोल करायचा, ही व्यूहरचना यशस्वी ठरली. बारामती, सातारा या जागा त्यांनी राखल्या असल्या तरी माढा, कोल्हापूर गमावल्या आहेत. शिरूर, रायगड आणि अमरावती या नवीन जागा त्यांना मिळाल्या असल्या तरी उर्वरित महाराष्ट्रात त्यांचे अस्तित्व काय? असा प्रश्न उभा राहतो. याचमुळे चार महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीचा पेपर राष्ट्रवादीसाठी कठीण ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here