‘पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी’; शेलार यांनी साधला शिवसेनेवर निशाणा

एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.

ashish shelar
Adv. आशिष शेलार

एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी सहा जणांना अटक करण्यात आली असून समता नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यावरुन आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिसेनेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले Adv. आशिष शेलार?

‘कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण, कंगणाचे घर तोडलेत. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!! पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?’, असं शेलार यांनी ट्विट केले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार; नौदल अधिकाऱ्याला मारहाण केलेल्या सहा जणांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा देखील समावेश आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला होता.


हेही वाचा – मराठा आरक्षणावर अध्यादेशाचा पर्याय