कल्याणच्या मैदानात ‘शिंदे विरूध्द पाटील’ सामना रंगणार

कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे.

Mumbai
kalyan
कल्याण मतदारसंघ

राजकीयदृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित केली. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका जाहीर केल्याने यंदा मनसे निवडणूकीच्या रिंगणातून अगोदरच बाहेर पडली आहे. त्यामुळे शिंदे विरूध्द पाटील असाच सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंघात तिरंगी लढत 

कल्याण लोकसभेची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत मनसेच्या पारड्यात एक लाखापर्यंत मतदान पडले. यंदा लोकसभेची निवडणुकीत मनसेचा उमेदवार असणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच दुहेरी लढत होणार आहे. मागील दोन्ही निवडणुकीत शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार दिले होते. यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक उमेदवार दिला आहे. पाटील हे स्थानिक भूमीपुत्र असून, कल्याण शीळ रोडवरील देसई गावात वास्तव्याला आहेत. हा परिसर कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मोडतो. डॉ शिंदे हे ठाण्याचे रहिवासी असल्याने ते बाहेरचे उमेदवार म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे स्थानिक विरूध्द बाहेरचा उमेदवार असाही मुद्दा प्रचारात रंगणार आहे.

मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा 

कल्याण मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये मुंब्रा कळवा आणि उल्हासनगर या दोन मतदार संघात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि ज्योती कलानी हे आमदार आहेत. तर डोंबिवलीत भाजपचे रविंद्र चव्हाण, कल्याण पूर्वेत भाजप पुरस्कृत अपक्ष गणपत गायकवाड, कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर आणि अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर हे ४ आमदार आहेत. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी आहेत. मात्र त्यांची सून उल्हासनगर महापालिकेत भाजपची महापौर आहे. त्यामुळे ज्येाती कलानी राष्ट्रवादीला साथ देतील की नाही हे सुध्दा महत्वाचं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सख्य असल्याने यंदाच्या निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा नसला तरी सुध्दा अप्रत्यक्षपणे मनसेकडून राष्ट्रवादीला पाठींबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच अटीतटीची ठरणार आहे.