Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ईडी विरोधात सेनेचे शक्तिप्रदर्शन ? शिवसैनिक ५ तारखेला मुंबईत जमणार

ईडी विरोधात सेनेचे शक्तिप्रदर्शन ? शिवसैनिक ५ तारखेला मुंबईत जमणार

Related Story

- Advertisement -

आपल्याकडे असलेल्या ईडीचा गैरफायदा घेत राजकारण करण्याच्या कृतीविरोधात शिवसेनेने आता रस्त्यावर येण्याची तयारी चालवली आहे. भाजपवर टीका करणार्‍या नेत्यांविरोधात ईडीची चौकशी लावण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने वाढू लागल्या आहेत. याचा फटका शिवसेनेला बसू लागला आहे. विशेषत: सेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसनंतर शिवसेना खवळली आहे. सेना नेत्यांवरील ही कारवाई आकसाने केली जात असल्याचा आरोप करत या कारवाईविरोधात येत्या पाच तारखेला मुंबईत जमण्याची तयारी सेनेने केली असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले जात असून, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार आहेत. या दिवशी वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे निमित्त करत सेनेने ताकद दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील. एकप्रकारचे शक्तिप्रदर्शन शिवसेनेकडून केले जाणार आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करतेय हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.

- Advertisement -

वर्षा राऊत यांच्याआधी राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्यात आली. नंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावत चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले. सरदेसाई यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने शिवसेना आक्रमक होताना दिसत आहे. प्रताप सरनाईकांसह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीची नोटीस आली आहे. ईडीच्या नोटीसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचे षड्यंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.

ईडीकडून बजावण्यात येणार्‍या नोटीसा राजकारण डोळ्यापुढे धरून देण्यात येत असल्याचा फटका याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना बसला होता. निवडणुकीच्या ऐन प्रचारावेळी शरद पवारांवर नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस येताच पवार यांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाण्याचे ठरवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे संकटात आलेल्या ईडीने पवारांवरील नोटीस मागे घेतली होती. हाच धागा पकडून सेनेने हे शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरवल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -