नाटक संपले

Mumbai
Shiv Sena-BJP alliance

राज्यात शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, अशी संदिग्धता गेले काही महिने असताना अखेर सोमवारी युतीचे घोडे गंगेत न्हाले. सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्री बंगल्यावर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे.

तर येणार्‍या विधान सभेत मित्रपक्षांना त्यांच्या जागा सोडून उरलेल्या जागा सेना-भाजप निम्म्या निम्म्या लढणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. काल दिवस भर मुंबई, महाराष्ट्रात नव्हेतर तर देशभर सेना-भाजपच्या युतीची चर्चा होती. युतीबाबत प्राथमिक बोलणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झाली होती. मात्र अंतिम निर्णय अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत होणार होता.या चर्चेसाठी खास अमित शहा नवी दिल्लीहून दुपारी मुंबईत आले. त्यानंतर शहा, फडणवीस, पाटील हे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेसाठी मातोश्रीवर गेले. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.

त्यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर युतीबाबतची घोषणा करण्यासाठी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमार पत्रकार परिषद सुरु झाली. या पत्रकार परिषदेत अमित शहा, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडवणीस यांनी संबोधित केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात शिवसेना-भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये २५ वर्षांपासून युती असून काही मतभेद असले तरी आमचा मूळ विचार सारखा राहिलेला आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा एकदिलाने एकत्र येत आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर अयोध्याप्रश्नी ही यावेळी दोन्ही पक्षांनी निर्णय घेत राम मंदिराची उभारणी व्हायला हवी, अशी मागणी केली जात असून या मागणीचे पूर्ण समर्थन भाजप करत असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. तर यासाठी केंद्र सरकारने आधीच अयोध्यातील अविवादित ६३ एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मंदिराचा मार्ग सुकर झाल्याचा निर्वाळा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. तर सत्ता, पदे यापुरती ही युती मर्यादित नसून त्यापलीकडे जाऊन व्यापक देशहित डोळ्यापुढे ठेऊन ही युती झाली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक मुद्दे मांडले. शेतकरी, सामान्य माणसं, गरिबांचं हित जपण्याचा त्यांचा आग्रह राहिला, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

मनसेच्या उल्लेखाने पिकला हशा
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुन्हा मनसे एकत्र आले आहेत, असे मुख्यमंत्री वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर परिषदेत एकच हशा पिकला. त्यावर लगेचच तुमच्या मनात जे मनसे आहे ते मला म्हणायचे नाही हे मनसे म्हणजे दिलसे असे समजावे, असे स्पष्ट वक्तव्य केले.

युतीचा फॉर्म्युला
*लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढवणार
*विधानसभेसाठी शिवसेना १४४ तर भाजप १४४ जागांचे वाटप (मित्रपक्षांना यापैकी काही जागा सोडण्यात येतील. )
*विधानसभेत सत्ता आल्यानंतर राज्य सरकारमध्ये समसमान मंत्रीपदे
*नाणार प्रकल्प स्थगित, ग्रामस्थांना प्रकल्प नको असेल तर त्या ठिकाणी होणार नाही.
*मुंबईत ५०० स्क्वेअर फुटांची
*घरे करमुक्त

शिवसेनेचा युटर्न
*‘चौकीदार चोर है’ या राहुल गांधींच्या घोषणाचा उद्धव ठाकरेंकडून उच्चार
*सरकारविरोधात मंत्रालयावर शेतकर्‍यांच्या लाँगमार्चला पाठिंबा
*मराठा आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात मराठा मोर्चांना पाठिंबा
*पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मोदी सरकारवर टीका
*पहले मंदिर फिर सरकार’ची घोषणा करत अयोध्या यात्रा
*नोटबंदीनंतर नोटा बदलीच्या अधिकारासाठी सहकारी बँकांची बाजू

युती किमान ४५ जागा जिंकेल
शिवसेना-भाजप युती किमान ४५ जागा जिंकून लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी होईल. भारतीय जनता पक्षाचा सर्वात जुना कुणी साथीदार असेल, तर ते म्हणजे शिवसेना आणि अकाली दल हे आहेत. मधल्या काळात जे थोडे मतभेद होते, ते आता संपले आहेत आणि दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे याचा मला खूप आनंद आहे.आज भाजप-शिवसेनेच्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली.
– अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

शिवसेनेबरोबर आमची युती ही कोणत्याही राजकारणापलीकडची आहे. बळकट आणि विकसित भारत बनवणं या एका इच्छेने आम्हाला एकत्र बांधून ठेवले आहे. आम्ही एकत्र असण्याचा निर्णय हा आमच्या एकत्रित असण्याला अधिक बळकटी देणारा आहे. आमचे गटबंधन हीच महाराष्ट्राची पहिली आणि शेवटची निवड असेल अशी मला खात्री आहे. अटलजी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या दुरदृष्टीतून प्रेरणा घेत भाजपा आणि शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी कार्यरत राहील आणि भारताच्या संस्कृतीचा मान राखेल आमचे निवडून आलेले प्रतिनिधी हे विकास घडवून भ्रष्टाचारमुक्त आणि भारतीय संस्कृती जपणारे असतील – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हिंदुत्व आणि व्यापक राष्ट्रहितासाठी ३० वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युती झाली होती. ही युती २५ वर्षे घट्ट होती मात्र मधल्या पाच वर्षांत काही संभ्रम आणि गैरसमज निर्माण झाले. हे संभ्रम आता दूर झाले असून यापुढे कटू अनुभव येणार नाहीत, याच अपेक्षेने आम्ही एकत्र येत आहोत. भाजपसोबत युती करणार नाही, असे सांगणार्‍या शिवसेनेने भाजपसोबत युती केलीच कशी, असा प्रश्न विचारून आता माझ्यावर टीका होईल मात्र या टीकेला उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे. केवळ सत्ता हे आमचे ध्येय नसून व्यापक राष्ट्रहीत डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ही युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने राम मंदिर, शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री फसल विमा योजना, नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबत मुद्दे भाजपपुढे ठेवले होते. त्या सगळ्याबाबत मुख्यमंत्री व अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
– उध्दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here