दक्षिण मुंबई मतदारसंघ – शिवसेना-भाजप युतीने महाआघाडीच्या चिंतेत वाढ

नजर मतदारसंघाची,दक्षिण मुंबई मतदार संघ,मिलिंद देवरांच्या नकाराने काँग्रेस घायाळ

Mumbai
shivsena-bjp
शिवसेना- भाजप

मुंबईतील उच्चभ्रू मतदारसंघांपैकी एक मतदार संघ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नावारुपाला आलेला मतदारसंघ म्हणून मुंबईचा दक्षिण मुंबई हा मतदार संघ गणला जातो. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता तसा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेचा फायदा येथे शिवसेना पक्षाला झाला आणि विद्यमान खासदार अरविंद खासदार यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. यावेळेस मोदींचा प्रभाव कमी असला तरी यंदाही शिवसेना आणि भाजप दोघांमध्ये युती झाल्याने आघाडीच्या उमेदवाराचा मार्ग तसा कठीण आहे. त्यातच राहुल गांधीचे निकटवर्तीय आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढविण्यास तत्काळ नकार दिल्याने या मतदारसंघात आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तितका उत्साह सध्या दिसून आलेला नाही. त्यामुळे आघाडीकडून सध्या मिलिंद देवरा यांची नाराजी दूर करण्याचे पक्षश्रेष्ठींना प्रमुख आव्हान असणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त आहे. मतदासंघात भाजप आणि सेनेचे एकूण सहा आमदार आहेत. त्यापैकी कुलाबा आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर सेनेचे देखील वरळी आणि शिवडी मतदारसंघात दोन आमदार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अमिन पटेल हे एकमेव आमदार असून उर्वरित भायखळा मतदारसंघ हा एमआयएमच्या खिशात आहे. त्यामुळे सध्या तरी विधानसभा मतदारसंघनिहाय मतधिक्यांवर नजर टाकली असता युतीचे बलाबल याठिकाणी अधिक असल्याचे दिसून येते. परंतु सध्या सेना आणि भाजप मधील अंर्तगत वाद या मतदारसंघात देखील दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वीच सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार मंगलप्रभात लोढांविरोधात बंड पुकारले होते. त्यातच शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या गिरगाव या भागात मेट्रोच्या कामकाजामुळे अनेकांनी शिवसेना आमदार आणि खासदार यांच्याविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. सध्या तरी हा वाद मिटला असला तरी त्याचा फटका ऐन निवडणुकीत युतीला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकीकडे शिवसेना आणि भाजप यांना अंतर्गत वाद आणि इतर प्रश्न सतावित असले तरी आघाडीकडे याठिकाणी मजबूत उमेदवार नसल्याने याचा फायदा उचलता आलेला नाही. गेल्यावर्षी या मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. परंतु यंदा याठिकाणी मनसे उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेना आणि भाजपला एमआयएम वगळता मतविभागणीचा फटका बसणार नसल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी याठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांचे नाव युतीच्या उमेदवारीसाठी जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघात उच्चभ्रू मतदार संघ अधिक असल्याने त्यांना मतदानासाठी उतरविणे हे प्रमुख आव्हान उमेदवारांसाठी असणार असून उमेदवारांचे भवितव्य हे याठिकाणी होणार्‍या मतदानावर ठरणार आहे. जर शिवसेना मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रान्ट रोड, चर्नी रोड येथील मतदारांना मतदानादिवशी घराबाहेर काढण्यास अपयशी ठरल्यास चित्र वेगळे पहायला मिळू शकते.

मतदारसंघ क्रमांक – ३१

नाव – दक्षिण मुंबई
संबंधित जिल्हा – मुंबई शहर
मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग
एकूण मतदार(२०१४) – ७ लाख ७८ हजार ६६६
महिला मतदार – ३ लाख ४२ हजार ३६६
पुरुष मतदार – ४ लाख ३६ हजार २९२

२०१४ मधील मतांची आकडेवारी

अरविंद सावंत – शिवसेना – ३ लाख ७४ हजार ६०९
मिलिंद देवरा – काँग्रेस – २ लाख ४६ हजार ४५
बाळा नांदगावकर – मनसे – ८४ हजार ७७३
मीरा संन्याल – आप – ४० हजार २९८
नोटा – ९ हजार ५७३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here