घरमुंबईशिवसेनेचा अनुभवी ऐवजी नवीन नगरसेवकांवर अधिक विश्वास

शिवसेनेचा अनुभवी ऐवजी नवीन नगरसेवकांवर अधिक विश्वास

Subscribe

भाजप आक्रमक होत असताना शिवसेनेला ‘आरे’ला ‘कारे’ म्हणणाऱ्या नगरसेवकांची गरज

मुंबई महापालिकेत भाजप आक्रमक होत असल्याने सत्ताधारी शिवसेनेलाही आक्रमक होण्याची अधिक गरज आहे. त्यामुळे महापालिका सभागृहासह प्रत्येक समित्यांमध्ये भाजपच्या ‘आरे’ला ‘कारे’ म्हणण्याची ताकद असणाऱ्या अनुभवी सदस्यांची वर्णी लावणे आवश्यक आहे. मात्र, शिवसेना अनुभवी सदस्यांऐवजी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांवरच अधिक विश्वास टाकताना दिसत आहे.

मुंबई महापालिकेत सहा वेळा नगरसेवक बनलेल्या आणि माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्यासह प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, राजुल पटेल, राजू पेडणेकर, शुभदा गुढेकर, सुवर्णा करंजे, बाळा नर, माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यासह दोन ते तीन वेळा नगरसेवक बनलेल्या विश्वनाथ सदानंद परब, शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, यांच्यासह नवीन अमेय घोले, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, वसंत नकाशे, उर्मिला पांचाळ, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे आदी अभ्यास करून सभेत तसेच समित्यांच्या बैठकीत बोलणारे आहेत. यासर्वांची टिम बनवल्यास भाजपचे आक्रमण थोपवणे शिवसेनेला सोपे जाणार आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून महापालिकेच्या सभागृहनेतेपदी विशाखा राऊत या आहेत. कोविडच्या काळात सभागृह नेता बदलाच्या बातम्यांना उधाण आले होते. परंतु शिवसेनेकडून सध्या तरी या बदलाची चिन्हे दिसून येत नाहीत. सभागृहात सभागृहनेत्यांना पर्याय म्हणून माजी महापौर श्रध्दा जाधव या पर्याय ठरू शकतात. श्रध्दा जाधव या सहा वेळा नगरसेविका बनलेल्या असून नोव्हेंबर २००९ ते २०१२ या कालावधीत त्यांनी महापौरपदही भूषवले आहे. त्यामुळे ३० वर्षे त्यांना महापालिकेच्या कामकाजांचा आणि त्याअंतर्गत घेतलेल्या निर्णयांचे तसेच भाजपने वारंवार केलेल्या कुरघोडी यांचा चांगला अनुभव आहे. शिवाय सभागृहात विरोधकांना शिंगावर घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. विविध विषय अगदी सहजपणे मांडताना विरोधकांवर तेवढ्याच क्षमतेने आरोप करत त्यांचा समाचार घेण्याचीही त्यांची ताकद असल्याने श्रध्दा जाधव या सभागृहनेते पदाच्या शर्यतीत आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे भाजप आक्रमक झालेला आहे, ते पाहता जर राऊत यांना बाजुला केल्यास जाधवच पर्याय ठरु शकतात असे बोलले जाते.

सुधार समितीतही होणार रस्सीखेच

सुधार समितीत श्रध्दा जाधव यांना पुन्हा संधी दिली असून राजू पेडणेकर यांनाही पुन्हा नियुक्त केले आहे. त्यामुळे श्रध्दा जाधव यांना सभागृहनेते पद न दिल्यास सुधार समिती अध्यक्षपदी आजच्या स्थितीत त्यांना बसवणे शिवसेनेला योग्य ठरेल. जाधव यांचा सुधार समितीचा चांगला अनुभव आहे, आणि भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्या सर्वांच्य विरोधानंतरही कामकाज रेटून नेण्याची हातोटी त्यांची आहे. महापौरपद भुषवल्याने त्यांना याचा दांडगा अनुभव असून त्यांचा हा अनुभव पाहता पक्ष त्यांच्यावर जबाबदारी सोपवते का हे पहायचे आहे.

- Advertisement -

मार्गदर्शनाअभावी शिवसेना नगरसेवक चुप

मागील तीन वर्षांमध्ये शिवसेनेच्या काही अपवादात्मक नगरसेवक वगळता कुणीही सभागृहात तसेच समित्यांमध्ये आपली क्षमता सिध्द करू शकले नाही. तसेच सभागृहात महापौर आणि समित्यांमध्ये अध्यक्ष बोलू देत नसल्याने अनेक शिवसेना नगरसेवकांना आपले विषय मांडण्यात अडचणी येत आहेत. परंतु भविष्यात भाजप आक्रमक झाल्यास त्यांचा समाचार घेण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला बोलायची संधी देवून त्यांना त्यांच्या अंगावर सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेला आता भविष्यात सभागृहनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांचे ज्ञान असणाऱ्या नगरसेवकांच्या एक टिम बनवून त्यांना त्या त्या प्रमाणे बोलायची संधी दिल्यास शिवसेनेकडून भाजपचे आक्रमण परतवून लावले जावू शकते. परंतु आजवर केवळ मार्गदर्शनाअभावी शिवसेनेचे नगरसेवक केवळ समित्यांमध्ये व सभागृहात चुप बसताना दिसत आहेत, त्या तुलनेत भाजपचे नगरसेवक बोलघेवडे दिसत आहे. सभागृहात बोलण्याची संधी मिळाल्याने भाजपच्या नगरसेवकांची हिंमत वाढली असून त्यामुळे शिवसेनेला अंगावर घेण्याची त्यांची पूर्ण क्षमता आहे.

शिवसेनेची बाजु झाली लंगडी

मनसेतून शिवसेनेत आलेले मामा लांडे यांच्यासह रमेश कोरगावकर हे आमदार बनले. आमदार बनल्यामुळे त्यांचे महापालिकेतील लक्ष कमी झाले आहे. त्यामुळे सभागृहात या दोन्ही नगरसेवकांनी उपस्थिती लावल्यास या अनुभवी नगरसेवकांमुळे शिवसेनेची बाजु मजबूत होवू शकते. परंतु यांचे महापालिकेकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेची एक बाजु लंगडी झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -