घरमुंबईभूखंडाच्या मुद्यावरून शिवसेना पुन्हा एकाकी

भूखंडाच्या मुद्यावरून शिवसेना पुन्हा एकाकी

Subscribe

विरोधी पक्षाकडून शिवसेनेला श्रीखंड भेट

कांदिवली पोयसर आणि गोरेगाव-मालाड येथील आरक्षित भूखंड महापालिकेच्या ताब्यात न घेता विकासकांना देण्याचा घाट घालणार्‍या सत्ताधारी शिवसेनेचा तीव्र निषेध विरोधी पक्षांनी केला. भूखंडाच्या मुद्यावरून विरोधकांना पहारेकरी असलेल्या भाजपनेही साथ दिली. त्यामुळे शिवसेना सभागृहात भूखंडाच्या मुद्यावरून एकाकी पडली. कुर्ल्यापाठोपाठ सहा भूखंडांचे श्रीखंड खाणार्‍या शिवसेनेला खरोखरच श्रीखंडाचा डबा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी भेट दिला. त्यामुळे शिवसेनेच्या रणरागिणी संतापल्या आणि त्यांनी राखी जाधव यांना घेराव घालण्यासाठी महापौरांच्या आसनामागून वेलमध्ये धाव घेतली. परंतु विरोधकांसह भाजपाच्या सदस्यांनी सुरक्षेचे कडे उभारताच शिवसेनेच्या नगरसेविकांना आल्या पावली परतावे लागले.

कुर्ल्यातील आरक्षित भूखंडाबाबत मुंबईतील अन्य सहा आरक्षित भूखंडांचे प्रस्ताव फेटाळून लावत मालकांना मदत केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सभागृहात निवेदन केले. सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी मुंबईकरांना मामा बनवले असा आरोप करत राजा यांनी अध्यक्ष असूनही लांडे यांनी विकासक आणि जागेमालकांची भलामण केल्याचे सांगितले. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पार्टी फंडा करता भूखंड ताब्यात न घेता त्यावर आरक्षण हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे सहाही भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रस्तावांचा फेरविचार करावा अशाप्रकारचे पत्र विरोधी पक्षांसहित भाजपानेही दिलेले आहे. त्यामुळे हे भूखंड ताब्यात घेतले जावेत अशी मागणी त्यांनी केली. याला सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा देतानाच जर एकही मोकळ्या भूखंडाचा जागा देणार नाही, असे सांगणार्‍या शिवसेनेचे सहा प्रस्ताव फेटाळताना धोरण बदलले कसे असा सवाल केला.

- Advertisement -

युतीच्या पतंगाची कन्नी कापली गेली आहे. त्यामुळे पतंगाचा जोर मजबूत करा असा सल्ला देत अशाप्रकारे प्रस्ताव नामंजूर करून मुंबईकरांची फसवणूक करू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी सांगितले. मुळात विकास आराखडा आताच बनला आहे. त्यामुळे पहिल्या दहा वर्षात आरक्षित भूखंडावर निर्णय घेण्याचा अधिकारी सुधार समिती अध्यक्षांना नाही. तो राज्य सरकारला आहे. त्यामुळे विकास नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी व्हायला हवी. मुळात एकही आरक्षित भूखंडाचा प्रस्ताव नामंजूर केला जात नाही, ही आजवरची परंपरा आहे. त्यामुळे एकही इंचही जागा हातची जावू देणार नाही, हे भाजपाचे धोरण असून तुम्ही(शिवसेना)केलेल्या पापाचे आम्ही धनी होणार नाही, असे सांगत कोटक यांनी तुम्ही मुंबईकरांची फसवणूक करू नका असे शिवसेनेला उद्देशून खडे बोल सुनावले.

राष्ट्वादी काँग्रेसच्यावतीने श्रीखंड डबा भेट
या मुद्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव बोलण्यास उभे राहिल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. लांडे यांनी विरोधी पक्षनेत्यांचे नाव घेवून आरोप केलेले असताना त्यांना त्याची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. या गोंधळातच यशवंत जाधव यांनी भाषणाला सुरुवात करत विरोधकांवर आसूड ओडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी यशवंत जाधव व दिलीप लांडे यांना श्रीखंडाचा डबा भेट दिला. भूखंड खाण्याऐवजी श्रीखंड खावा,बॉक्स असा उपरोधिक सल्लाच त्यांनी दिला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक झाले.

- Advertisement -

शिवसेनेच्या रणरागिणींची चाल…
श्रीखंडाचा डबा भेट दिल्यावर शिवसेेनेच्या राजुल पटेल, शितल म्हात्रे, सुवर्णा कारंजे, सभागृहनेत्या विशाखा राऊत, सुजाता पाटेकर, अरुंधती दुधवडकर आदी नगरसेविकांनी महापौरांच्या शेजारुन वेलमध्ये प्रवेश केला. यावेळी डब्यातील श्रीखंड हे राखी जाधव व रईस शेख यांच्या तोंडाला फासण्याचा डाव होता. सेनेच्या रणरागिणींचा हा डाव लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्वादी, सपासह भाजपाचे सर्व सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांना संरक्षण दिले. त्यामुळे यासर्वांना श्रीखंड फासण्याऐवजी रिकामी हातानेच माघारी फिरावे लागले.

लांडे मामा चोर है….
या गोंधळातच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबजी करण्यास सुुरवात केली. गली गली शोर है… लांडे मामा चोर है…परत करा… परत करा, भूखंड परत करा अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले होते. मात्र या गोंधळात सेनेच्या नगरसेवकांनी गप्प राहण्याशिवाय गत्यंतर राहिले नव्हते. अखेर या गोंधळातच निवेदनावरील चर्चा पिठासिन अधिकारी असलेल्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी गुंडाळली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -