घरमुंबईशिवसेना आता कॉर्पोरेट बनली!

शिवसेना आता कॉर्पोरेट बनली!

Subscribe

पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा होता, धाक होता, भीती होती. मग राजकीय नेते असो किंवा सेलिब्रिटी असोत. ती भीती आता राहिलेली नाही. कारण शिवसेना आता कॉर्पोरेट झाली आहे.

पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा होता, धाक होता, भीती होती. मग राजकीय नेते असो किंवा सेलिब्रिटी असोत. ती भीती आता राहिलेली नाही. कारण शिवसेना आता कॉर्पोरेट झाली आहे. कॉर्पोरेटचे सगळे नियम इथेपाळले जातात. मग काहीही करा आणि यशाची गणितं मांडा आणि ही गणितं मांडण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धापन दिन मेळाव्यासाठी शिवसेनेच्या व्यासपीठावर येणार आहेत, असे मत राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांनी ‘माय महानगर’चा पहिल्या वर्धापन दिन आणि शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन यांचे औचित्त्य साधून महानगरच्या कार्यालयात आयोजित विशेष ‘फेसबुक लाइव्ह’ या कार्यक्रमात मांडले. या विशेष कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आणि राजेश कोचरेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांनी यावेळी परखड भूमिका मांडली.

शिवसेनेचे स्वरूप बदलतेय

शिवसेनेच्या बदललेल्या स्वरूपाविषयी बोलताना राजेश कोचरेकर म्हणाले ‘पूर्वी बाळासाहेबांचा दरारा होता, धाक होता, भीती होती. मग राजकीय नेते असो किंवा सेलिब्रिटी असोत. ती भीती आता राहिलेली नाही. कारण शिवसेना आता कॉर्पोरेट झाली आहे. कॉर्पोरेटचे सगळे नियम इथे पाळले जातात. मग काहीही करा आणि यशाची गणितं मांडा आणि ही गणितं मांडण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धापन दिन मेळाव्यासाठी शिवसेनेच्या व्यासपीठावर येणार आहेत. ही गणितं असतील आदित्य ठाकरेंसाठी,तेजस ठाकरेंसाठी, हातातले आमदार-खासदार निसटू नयेत यासाठी. ही अपरिहार्यता आहे. प्रायोगिक-कलात्मक चित्रपट चालत नाहीत. मसाला चित्रपट चालतो. उद्धव आणि देवेंद्र फडणवीस यांनी सेना-भाजप युतीचा मसाला चित्रपट बनवण्याचं ठरवलंय’. ‘भाजपचा डोळा सध्या शिवसेनेच्या मराठी वोटबँकेवर आहे. जे काँग्रेसने आधी मुंबईच्या बाबतीत केलं, तेच आता भाजपही करत आहे. पक्षहितासाठी देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात. म्हणून ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या वादग्रस्त व्यक्तीच्या दहीहंडीला मुख्यमंत्री दीड तास हजर होते. भाजप हे सगळं शिवसेनेची वोटबँक घेण्यासाठी करत आहे’, असंही यावेली कोचरेकर म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंपुढची वेगळी आव्हाने

या दोन्ही मान्यवरांनी शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांसमोरच्या आव्हानांची तुलना केली. ‘आदित्य ठाकरेंसमोरची आव्हाने ही बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंपेक्षा वेगळी आहेत. आताचे युग तंत्रज्ञान, माहिती, पर्यावरण, सुशिक्षितांचे आहे. शिवाय बाळासाहेबांच्या आपल्यावरच्या उपकारांचे उतराई होण्यासाठी सध्याचे शिवसेना नेते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण आता आदित्य ठाकरेंना त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आजही ही मुंबई सामान्य माणसाची, कष्टकर्‍यांची, कामगारांची आहे. ओपन टेरेसवरचे कॅफेटेरिया आणि नाईट क्लब हे प्रश्न घेऊन आदित्य ठाकरे हा पल्ला गाठू शकणार नाही’,असे कोचरेकर यावेळी म्हणाले.

हिंदुत्वाच्या रेट्यापुढे शिवसेना बदलली

‘चित्रलेखा’साप्ताहिकाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी यावेळी शिवसेनेच्या परिवर्तनावर आपली रोखठोक भूमिका मांडली. ‘90च्या दशकापर्यंत शिवसेना भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर ठाम होती, पण हिंदुत्वाच्या रेट्यापुढे शिवसेना नको तितकी राष्ट्रीय झाली. नाहीतर वेगवेगळ्या बंद पडलेल्या युनियनच्या किंवा लोकाधिकार समितीच्या कामापेक्षा शिवसेनेला अयोध्येचे राममंदिर महत्त्वाचं ठरलं नसतं’,असे महाराव म्हणाले. शिवसेना नेतृत्व अधिकाधिक स्वकेंद्रित झाल्यामुळे या संघटना बंद पडल्याचं देखील त्यांनी सांगितलं. ‘याच मुद्द्यावर भाजपशी युती असल्यामुळेच वारंवार भांडूनही ते एकत्र येतात आणि मनसेसोबत शिवसेना एकत्र येऊ शकत नाही’, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

‘अयोध्येत देवळं बांधण्यापेक्षा शाळा बांधा’

राम मंदिराच्या मुद्द्यावरही महारावांनी शिवसेनेवर परखड टिप्पणी केली. ‘देवळं बांधणं हे काय तुमचं काम आहे का? त्यापेक्षा शाळा बांधा. तुमची भवानी बँक 50 वर्षांची झाली तरी तिच्या फक्त दोनच शाखा आहेत. तिच्या 200 शाखा का नाही केल्या? बाळासाहेब ठाकरे कधीच गेले नाहीत अयोध्येला. मग तुम्ही का गेले अयोध्येला? त्यात कुठला स्वाभिमान तुम्ही बघता?’,असं ते म्हणाले.

‘यांनी मच्छी फ्राय सोडून बोंबील घेतलं इतकंच!’

किरीट सोमय्या प्रकरणावर या दोघांनी शिवसेनेवर टीका केली.‘किरीट सोमय्यांच्या बाबतीत शिवसैनिकांनी एक भूमिका घेतली होती. त्यात जे 12-13 शिवसैनिक अडकले, त्यातल्या किती लोकांची चौकशी उद्धव ठाकरेंनी केली?ही पद्धत बाळासाहेब ठाकरेंची होती. बाळासाहेब ठाकरे असते तर किरीट सोमय्यांना तर बसवलंच असतं, पण मनोज कोटक यांनाही चालू दिलं नसतं. शिवसेनेने सध्या मच्छी फ्रायपेक्षा बोंबील घेतलं इतकंच!’,असं महाराव म्हणाले. तसेच, ‘बाळासाहेबांनी आपल्या ताकदीच्या जोरावर भाजपला अगतिकता करून ठेवलं होतं. आजच्या नेतृत्वामध्ये ती क्षमता नाही. अटलजींनाही अ‍ॅडजस्ट करायला लावणारा शिवसेनेचा दरारा आता राहिलेला नाही. सत्तेची चटक लागली की हिंमत निघून जाते’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्रीपदाचा निर्णय योग्यवेळी – फडणवीस

हेही वाचा – शिवसेनेसाठी येतोय डार्क हॉर्स; कीप वॉचिंग!


 

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -