घरमुंबईयुतीसाठी आग्रही सेनेची सत्वपरीक्षा!

युतीसाठी आग्रही सेनेची सत्वपरीक्षा!

Subscribe

शिवसेना आणि भाजपची युती होईल का हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा प्रश्न आहे. राजकारणाच्या ट्रेंडींगवर असलेला हा मुद्दा आहे. युती होणार की दोघांचे फाटणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कुणाला यांचे जुळलेले पहायचे आहे, तर कुणाला यांचे फाटलेले. पण आज जरी युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असला तरी युती होणारच आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे. आज युतीसाठी पहिले आग्रही आहेत ते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे. कारण मेट्रो भवनच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युती कायम राहणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली. त्यानंतर ते सातत्याने युतीबाबत बोलतांना दिसतात. त्या तुलनेत भाजप मात्र युतीबाबत जाहीर वाच्यता करताना दिसत नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला युतीचे महत्व कळून आले. त्यामुळे युती शिवाय निवडणूक लढणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारुन घेण्यासारखा प्रकार आहे, हे उध्दव ठाकरे यांना चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळेच ते युतीसाठी आग्रही आहे. या निवडणुकीत भाजप युती नक्की करेल. परंतु आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला त्यांची जागा भाजप नक्कीच दाखवणार आहे. त्यामुळे भविष्यात युतीचे दरवाजे बंद होणार असल्याने शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि युवराजांच्या राजकीय कारकिर्दीसाठी युती हाच महत्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे राजकीय महत्व वाढवण्याच्यादृष्टीकोनातून आणि राजकारणात त्यांना मजबूत पाय रोवण्यासाठी ही युती आवश्यक आहे. त्यामुळे ही युती होणार आहे. पण ही युती करताना, भाजपने दिलेला प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय उरणार नाही.

- Advertisement -

शिवसेना आणि भाजपची युती ही तशी १९८९ पासूनची. तेव्हापासूनच्या विधानसभा शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी जास्त होत राहिली आहे. १९९९मध्ये शिवसेनेचे ६९आमदार होते. त्यानंतर २००४मध्ये ही संख्या ६२ एवढी झाली, तर त्यानंतर २००९मध्ये ही संख्या पुन्हा कमी होवून ४५ वर आली. पण २०१४मध्ये युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवून शिवसेनेने ६३ आमदार निवडून आणले. बाळासाहेब नसताना उध्दव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाखाली आमदारांचा हा आकडा पार केला. परंतु हा आकडा आगामी विधानसभेत स्वबळावर लढवल्यानंतर वाढला जाईल,याबाबत मात्र शंका आहे. सध्या शिवसेनेत जी आयारामांची लाट सुरु आहे, या लाटेच्या महापुरात शिवसेनेसाठी सुगीचे दिवस आहेत,असे जे काही चित्र रंगवले जात आहे, तसे काही नाही. परंतु स्वबळावर निवडणूक लढवण्याची जर कुणाची क्षमता असेल ती मात्र शिवसेनेची.

भाजपकडेही तळागाळापर्यंत पोहोचणार्‍या कार्यकर्ते यांची फौज नाही, तेवढी सैनिकांची फौज शिवसेनेकडे आहे. पण समाजकार्य आणि निवडणूक या दोन वेगळ्या बाबी आहेत. चांगले समाजकारण करणारा निवडून येतोच असे नाही. आजचे मतदार सुज्ञ आहेत आणि ते हवेचा रोख समजून त्या दिशेला वळत असतात. सध्या देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रची हवा असल्याने शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढवणे हे मोठे दिव्यच नाही तर मोठे आव्हानच आहे.

- Advertisement -

एकाबाजुला उध्दव ठाकरे हे युतीची घोषणा करत आहे. तर दुसरीकडे राज्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे हे रॅलीमधून जनआशिर्वाद घेत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सुप्त भावनाही उघड होते आहे. शिवसेनेकडे विश्वासघातकी म्हणूनच भाजप पाहत आहे. कधी नाणार तर कधी मेट्रोच्या नावाने शिवसेनेने सत्तेत राहून विरोधाची भूमिका घेत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आज मेट्रोसाठी कापण्यात येणार्‍या आरेतील झाडे कापण्यास विरोध करत दोन चार जागा आपल्या झोळीत टाकण्याचे दबावतंत्र शिवसेना करत आहे. त्यामुळे युती करताना याचा फायदा शिवसेनेला होणार आहे.

परंतु आज जरी भाजप, शिवसेनेचा युतीचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयारी झाली तरी आगामी २०२२च्या महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेनेशी काडीमोड घेवून निवडणूक लढवेल. यामध्ये भाजप सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून मोदी व शहा यांचे वर्चस्व दाखवून देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -