घरमुंबईअनपेक्षित आणि अनाकलनीय...

अनपेक्षित आणि अनाकलनीय…

Subscribe

मुंबईच्यामहापौरपदी किशोरी पेडणेकर निश्चित

स्नेहल आंबेकर आणि विश्वनाथ महाडेश्वर या दोन महापौरांना आपला विशेष प्रभाव पाडता न आल्याने 2022 च्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी शिवसेना एखाद्या कसदार आणि दमदार नगरसेवकाला मुंबईचा महापौर होण्याची संधी देईल अशी सगळ्यांची अटकळ होती. मात्र मातोश्रीने आपल्या धक्कातंत्राची परंपरा कायम राखत मुंबईच्या महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करत सर्वपक्षीय नगरसेवकांसह मुंबईकरांनाही अनपेक्षित आणि अनाकलनीय निर्णयाची प्रचीती दिली आहे.

विरोधकांनी किशोरी पेडणेकर यांच्यासमोर उमेदवार दिला नसल्यामुळे त्यांची निवड ही निश्चित झाली आहे. या निवडीमुळे यशवंत जाधव, मंगेश सातमकर, विशाखा राऊत, आशिष चेंबूरकर यांच्यासह पूर्व उपनगरातील नगरसेवकांच्या पदरी निराशा पडली आहे. 2002 सालापासून मुंबई महानगरपालिकेत चौथ्यांदा निवडून येणार्‍या आणि प्रभाग समितीसह स्थापत्य समिती सारख्या महत्त्वाच्या समित्यांवर किशोरी पेडणेकर यांनी काम केले आहे.

- Advertisement -

किशोरी पेडणेकर या मुंबईतील 199 क्रमांकाच्या विभागातून महापालिकेत निवडून जातात. 2022 मध्ये होणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकणे हे शिवसेनेसाठी सर्वात कठीण आव्हान असणार आहे. कारण आता शिवसेनेला अपशकुन न करता भाजपने दोन वर्षांनंतर स्वत:च्या ताकदीवर महापौर बनवायचा संकल्प सोडला आहे. अशावेळी स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती न करता विकास कामे, मुंबईकरांच्या समस्या आणि शिवसेनेचा जोरकस ठसा उमटवणारा महापौर मुंबईला देण्याची रणनिती शिवसेनेत तयार होत होती. त्यानुसार स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्या महापौरपदाच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होती. त्याचप्रमाणे आशिष चेंबूरकर आणि दादरमधील ज्येष्ठ नगरसेविका मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाचीसुद्धा चर्चा होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीमध्ये बसून उद्धव ठाकरे यांनी महापौरपदाच्या उमेदवारीबाबत मंथन केले. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनिल परब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते.

यशवंत जाधव यांच्या पत्नीला भायखळा विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेने उमेदवारी दिली. मोठ्या हिमतीने यशवंत जाधव यांनी यामिनी जाधव यांना निवडून आणताना एमआयएमच्या वारिस पठाण यांचा पराभव केला. त्याआधी यशवंत जाधव यांनी स्थायी समितीची रमेश कोरगावकर यांच्या कार्यकाळात विस्कटलेली घडी यशस्वीपणे बसवून दिली. त्याची बक्षिसी म्हणून जाधव यांना महापौरपद मिळेल अशी सगळ्यांची अटकळ होती. तर मंगेश सातमकर यांना मागच्या वेळेला स्थायी समिती अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची वर्णी लागेल असाही एक मतप्रवाह होता. मात्र किशोरी पेडणेकर यांची निवड करून मातोश्रीने त्यांना महापौरपद दिले असले तरी विशाखा राऊत यांच्या तुलनेत जाधव यांच्यासाठी नियंत्रणात राहू शकणारा महापौर दिलेला आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या सुनील प्रभू आणि श्रद्धा जाधव यांनी खूपच लक्षणीय कामगिरी केली होती. प्रभू यांच्या तुलनेत श्रध्दा जाधव वादग्रस्त ठरल्या असल्या तरी या दोन्ही महापौरांच्या व्यक्तिमत्वाचा मुंबईकरांवरील प्रभाव, प्रशासनाची समज, माध्यमांना हाताळण्याचे कौशल्य हे वादातीत होते. त्यांच्या तुलनेत किशोरी पेडणेकर या काहीशा अल्पप्रभावी वाटत आहेत. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण येऊनही किशोरी पेडणेकर यांच्या अनपेक्षितपणे झालेल्या निवडीमुळे 15 नगरसेवक असूनही पूर्व उपनगरावर अन्याय झाला आहे. या विभागातील शिवसेना विभागप्रमुख रमेश कोरगांवकर आणि राजेंद्र राऊत यांना आपली बाजू समर्थपणे मांडता आलेली नाही, याकडेही सेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -