भाजपच्या आक्षेपानंतरही डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड!

Neelam Gorhe

भाजपनं विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असताना दुसरीकडे विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव मांडून घेतला. अनिल परब यांनी यासंदर्भातला प्रस्ताव मांडल्यानंतर तो एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपने यावर आक्षेप घेतला. ‘उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अनेक सदस्य अनुपस्थित आहेत. त्यामुळे या परिस्थितीत ही निवडणूक घेतली जाऊ नये’, अशी मागणी दरेकर यांनी केली. मात्र, ‘याचिकेसंदर्भात किंवा त्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासंदर्भात उच्च न्यायालयाने मला अद्याप काहीही कळवलेलं नाही. त्यामुळे आक्षेप मान्य करता येणार नाही’, असं म्हणत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आल्याचं जाहीर केलं.

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिलं आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले.

दरम्यान, उपसभापती पदासाठी भाजपकडून भाई गिरकर यांनी देखील अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी हा अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.