घरमुंबईमुख्यमंत्र्यांनी किमान धिक्कार करावा, सामनातून जाहीर टीका

मुख्यमंत्र्यांनी किमान धिक्कार करावा, सामनातून जाहीर टीका

Subscribe

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून बेळगाव लाठीचार्ज प्रकरणी पुन्हा एकदा भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

बेळगावमध्ये मराठी भाषिकांना झालेल्या मारहाणीवरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘बेळगावातील मराठी जनतेची डोकी फुटत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याचा साधा धिक्कार तरी करायला हवा होता’, अशी टीका त्यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाल्याबद्दल सर्वत्र ‘जश्न’ साजरा होत आहे. स्वागत आणि अभिनंदनाच्या अक्षता, फुलांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू असतानाच बेळगावातील मराठी बांधवांवर कानडी दंडुक्यांचा वर्षाव झाला. अनेकांची डोकी फुटली, हाडे मोडली, अनेकांना फरफटत तुरुंगात डांबले. मराठी बांधवांचे काय चुकले? तर त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा पुकार करीत एक सायकल रॅली काढली आणि माय मराठीच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या’.

‘मोर्चा काश्मिरी फुटीरतावाद्यांचा नव्हता’

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे, ‘हा मोर्चा कश्मीरातील फुटीरतावाद्यांचा नव्हता व या मोर्चात देशद्रोही घोषणा नव्हत्या. कश्मीरात फडकवतात तसे इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवीत कुणी पोलिसांवर हल्ले करायला पुढे सरसावले नव्हते. बेळगावसह सीमाभागातील मराठी भावनांची कदर करा एवढेच सांगत हे तरुण रस्त्यावर उतरले होते. मात्र कानडी पोलिसांनी त्यांची डोकी फोडली. गेल्या ६०-७० वर्षांत शेकडो वेळा येथील मराठी माणसाचे रक्त सांडले. अनेकांनी बलिदाने दिली तरीही कानडी विळखा झुगारून देण्याची सीमाभागातील मराठी माणसाची जिद्द आणि संघर्ष तसूभरही कमी झालेला नाही. पिढ्या बदलल्या तरी महाराष्ट्रात जाण्याची मागणी कायम आहे. या लोकभावनेस तुमच्या लोकशाहीत काही किंमत आहे की नाही?’ असा सवालदेखील अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – ‘आता मुख्यमंत्र्यांचं रक्त उसळेल का?’


‘…तर चंद्रकांत पाटलांचं कौतुक केलं असतं’

‘बेळगावात मराठी माणसांची डोकी फुटत असताना सत्तेचा चौकार मारलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?’ असा सवाल देखील त्यांनी सामनातून उपस्थित केला. तसेच ज्यांच्यावर सीमाभागाच्या समन्वयाची, संपर्काची कायदेशीर जबाबदारी सोपवली आहे ते कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील एव्हाना बेळगावात मराठीजनांच्या जखमांवर फुंकर घालताना दिसले असते, तर आम्ही त्यांचे जाहीर कौतुक केले असते, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -