समाजवादी, राष्ट्रवादीला शिवसेनेकडून समित्यांचे बक्षीस

शिवसेनेला आता पक्षाकडून मुहूर्ताची प्रतीक्षा

mcgm

न भूतो, न भविष्यती.. असा प्रकार मुंबई महापालिकेच्या शिक्षण तसेच स्थायी समिती सह सर्व वैधानिक व विशेष समित्यांच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चक्क हिंदुत्ववादी शिवसेनेला मतदान केले. राज्यासह महापालिकेतही या दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म पाळल्याने या दोन्ही पक्षांना बक्षीस म्हणून समिती बहाल करण्याची तयारी सेनेने दर्शवली आहे. पण या समिती यंदा स्वीकारायच्या की पुढच्या वर्षी याचा मुहूर्त पक्षाकडून ठरवला जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण व स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मते आपल्याकडे वळवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. मात्र, या दोन्ही पक्षाला आपल्याकडे वळवताना काँग्रेसला तटस्थ ठेवून त्यांना विरोधी पक्ष म्हणून त्यांचे स्थानही अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. पण या बदल्यात सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समित्या सोडण्याची तयारी सेनेने केलेली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला एम/ पूर्व प्रभाग समिती एल प्रभाग समिती सोडण्यात येणार आहे. यावर्षी या दोन समित्या घेतलास त्यांना पुढील वर्षी विशेष समिती सोडली जाऊ शकते. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेकडून यंदा या समित्या स्वीकारतात की पुढील वर्षी यावर सर्व अवलंबून आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी चार दिवस आधी सेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आवाज उठवला, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे आभार मानले. त्यानंतर निर्माण झालेला हा गोडवा पुढे कायम ठेवत त्यांनी सेनेच्या झोळीत उघडपणे मतांचे दान टाकले. हिंदुत्ववादी भाजपला दूर ठेवण्यासाठी दुसऱ्या हिंदुत्ववादी शिवसेनेला समाजवादी पक्षाचे उघडपणे मदत करत मतदान करण्याची ही आजवरची पहिलीच घटना आहे. या पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा केवळ सेनेला मदत असून पुढील वर्षी समित्या घेऊन एकप्रकारे सत्तेतील सहभागी पक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली जाईल, असे बोलले जात आहे.

 

समाजवादी पक्ष हा मुंबईतील गोर गरिबांचा, कष्टकऱ्यांचा, सामान्यजनांचा पक्ष आहे. जनसमान्यांनाचे आणि मुंबईचे प्रश्न मांडणारा पक्ष आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्षे समाजवादी पक्ष एक आक्रमक भूमिका घेणारा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख आहे. त्यामुळे वेळप्रसंगी सामान्य मुंबईकरांच्या हितावर आच आल्यास समाजवादी पक्ष विरोध करेल परंतु जातीवाद आणि धर्मवादाची पार्श्वभूमी असणाऱ्या भाजपच्या मुंबई महानगरपालिकेमधील सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना कधीच सफल होऊ देणार नाही.

आमदार रईस शेख, गटनेता, महापलिका समाजवादी पक्ष

मुंबई महानगराच्या दूरगामी विकासाचे आणि प्रगतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, मुंबईकरांच्या हितास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने भाजपाला महानगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा हेतू आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या बाजूने मतदान करण्याच्या निर्णय आम्ही घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तात्विक व सैद्धांतिक धोरणांनुसार जनतेच्या हितालाच कायम अग्रस्थानी ठेवण्याचा आमचा निर्धार आहे आणि कायम राहील.

राखी जाधव, गटनेता, महापलिका राष्ट्रवादी काँग्रेस