घरताज्या घडामोडीसंजय राऊत का गुप्तपणे भेटले फडणवीसांना? त्यांनीच केला खुलासा!

संजय राऊत का गुप्तपणे भेटले फडणवीसांना? त्यांनीच केला खुलासा!

Subscribe

आज दिवसभर एकीकडे चर्चा होती ती दीपिका पदुकोन (Deepika Padukon), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या बॉलिवुड अभिनेत्रींच्या NCB कडून झालेल्या चौकशीची. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका गुप्त भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन नव्या राजकीय गणितांवर सत्तेचा संसार मांडणार का? यावर अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये दुपारी दीडच्या सुमारास या संजय राऊत (Sanjay Raut) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाली. पण या चर्चेविषयी दोघांपैकी कुणीही संध्याकाळपर्यंत बोललं नव्हतं. त्यामुळे त्यावरून बरीच राजकीय खिचडी शिजली. पण शेवटी खुद्द संजय राऊत यांनीच या बैठकीत काय झालं याचा खुलासा केला आहे!

काय म्हणाले संजय राऊत?

या भेटीविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘आमची भेट अजिबात गुप्त नव्हती. आम्ही जाहीरपणे भेटलो होतो. मध्यंतरी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेतली होती. त्यावेळी मी हेही सांगितलं होतं की भविष्यात मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत घेणार आहे. त्यामध्ये ‘सामना’साठी मला फडणवीस यांची मुलाखत घ्यायची होती. त्यासंदर्भातच मी त्यांना आज भेटलो. देवेंद्र फडणवीसांना भेटणं हा अपराध आहे का? ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे राजकारणात अशा भेटी होत असतात’, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

‘मनाने फार दूर गेलो आहोत’

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या या भेटीवरून (Sanjay Raut Meets Devendra Fadnavis) सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर भाजपमधून काही ज्येष्ठ नेत्यांनी मत व्यक्त केलं होतं. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील का? अशी विचारणा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ती शक्यता फेटाळून लावली होती. ‘आम्ही मनाने एकमेकांपासून फार लांब गेलो आहोत. त्यामुळे २ तासांच्या बैठकीतून पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.


नक्की काय घडलं होतं? वाचा सविस्तर – देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची २ तास गुप्त बैठक!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -