घरट्रेंडिंगशिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली!

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली!

Subscribe

2019 लोकसभा निवडणूकपूर्व सेमी फायनल समजल्या जाणार्‍या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहता पाचपैकी तीन राज्यांतील भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. त्यामुळे राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना आगामी निवडणुकीत वाटाघाटी करण्यात वरचढ ठरण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपचा गडामध्ये झालेला पराभव हा शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. त्यामुळे राज्यात जरी शिवसेना धाकट्या भावाच्या रुपात असली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक २०१९च्या जागावाटपात सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली दिसणार आहे.1999 साली इंडिया शायनिंगचा नारा देत केंद्राची आणि राज्याची निवडणूक 6 महिने अगोदर घेतली होती. त्याचा फटका शिवसेना-भाजप युतीला बसला होता. आता मात्र 20 वर्षांनंतर पुन्हा दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास मोदींचा करिष्मा, शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार आणि मराठा समाजाला देऊ केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा फायदा पुन्हा भाजप सरकारला होईल अशी सावध प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थिंक टँकमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच फडणवीस आगामी काही दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचे फायदे पटवून देतील.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, मनसेनेही सुरुवातीपासूनच मिठाचा खडा टाकलेला आहे. त्यामुळे २५ वर्षांपासून नैसर्गिक युती आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील. दोघांनाही युती करण्याशिवाय पर्याय नसून, राम मंदिराचे निर्माण करण्यावर दोघांचे एकमत झाल्यानेच भाजप आणि शिवसेनेतील संबंध पुन्हा सुधारतील, अशी आशा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली. त्यामुळेच जागावाटप २००९नुसार की २०१४च्या विजयी फॉर्म्युल्यानुसार होणार हा मात्र कळीचा मुद्दा असेल, असेही तो नेता म्हणाला.23 जानेवारी 2018 रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात कोणतीही निवडणूक कुणासोबत लढणार नाही. यापुढील निवडणुका स्वबळावरच होईल, अशी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार असून, भाजपसोबत राहिल्यास शिवसेनेला फटका बसेल.

- Advertisement -

त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपसोबत युती न करता स्वबळावरच लढाव्यात अशी अपेक्षा बहुतेक शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढील काही दिवसांत स्वबळाची भाषा शिवसेनेची राहणार असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावर भर देण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील.भाजपच्या उत्तरेतील बालेकिल्ल्याला मतदारांनीच सुरुंग लावल्याने हजारो किलोमीटरवर पश्चिमेस राहणार्‍या मित्रपक्षाला आनंदाच्या उकाळ्या फुटल्या हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘भाजपने आत्मचिंतन करावे आणि समझनेवालोको इशारा काफी हैं’ अशी प्रतिक्रिया देत भविष्यातील शिवसेना-भाजपचे संबंध कसे राहतील याचीच झलक दाखवली आहे.

मागील साडेचार वर्षांतील भाजपच्या कारभाराचा लोकांना कंटाळा आला आहे. त्यांना बदल हवा होता, म्हणूनच काँग्रेसला लोकांनी मतदान केले. मोदी लाटेचा भाजपला आलेला माज मतदारांनी उतरवला आणि मतदारांप्रमाणेच मित्रपक्षाना गृहीत धरणे आता तरी मोदी, शहा सोडतील अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसमुक्त करता करता मतदारांनी भाजपमुक्त करुन दाखवले. गर्वाचे घर नेहमीच खाली असते ते पुन्हा मतदारांनी दाखवले. सत्ता आणि पैशाचा महापूर ओतून सुद्धा भाजपला सत्ता मिळवता आली नाही. अहंकारच भाजपला नडला, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री गिरीष महाजन यांनी पाचही राज्यांतील मतदारांच्या कौलाचा स्वीकार करतो असे सांगत राज्यात विकास आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची जादू कायम असल्याचे सांगत धुळे महानगरपालिकेचा दाखला दिला.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है…’ असे सांगत मतदारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे सांगितले.येत्या मे 2019 पूर्वी लोकसभेच्या निवडणुका होणार असून 2019 हे वर्षच निवडणूक वर्ष घोषित करायला हवे.कारण लोकसभेसोबत 8 राज्यांतील निवडणुका या एप्रिल ते नोव्हेंबर 2019 दरम्यान होतील. त्यात महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019ला होणार. बाकी सहाही राज्यांत हरयाणा, आंध्र प्रदेेश, ओडिसा, सिक्कीम अणि अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणुका या लोकसभेबरोबर एप्रिल- मे 2019 मध्ये होणार आहेत.२००९ साली मित्रपक्षांसह शिवसेनेने १६३ तर भाजपने १२५ जागा लढवल्या होत्या. २०१४ साली मात्र दोघेही स्वतंत्र लढल्याने जागावाटपाचा फॉर्म्यूला कोणता ठेवावा यावरच दोन्ही पक्षात एकमत व्हायला अडचणी येण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेनेची बार्गेनिंग पॉवर कमालीची वाढली हे मान्य करावेच लागेल.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -