घरमुंबईशिवसेनेचा अयोध्या दौरा ‘रामदर्शना’साठीच

शिवसेनेचा अयोध्या दौरा ‘रामदर्शना’साठीच

Subscribe

सामानातून सेनेची भूमिका स्पष्ट

मागच्या दोन आठवड्यांपासून शिवसेनेने अयोध्या दौर्‍याविषयी प्रचंड वातावरण निर्मिती केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्ये जावून राममंदिरासाठी ऐतिहासिक कार्य करतील, अशी भावना निर्माण झाल्याने सार्‍या देशाचे याकडे लक्ष लागले आहे, त्याचवेळी दोन दिवस आधी अर्थात शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातील संपादकीयातून उद्धव ठाकरे यांनी आम्ही ‘चलो अयोध्या’चा नारा दिलेला नाही तर रामदर्शनासाठी अयोध्येत निघालो आहोत, असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे, असे म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौर्‍याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलेला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारनेही उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लागणार्‍या परवानग्या नाकारून या दौर्‍यातील हवा कशी काढून घेता येईल, असा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून अखेर या दौर्‍यामागील भूमिका स्पष्ट करून वाढता विरोध शमवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे, त्याचवेळी भाजपवर आज आगपाखडही केली. आमच्या अयोध्या दौर्‍यामुळे हिंदुत्वाचे राजकारण करणार्‍यांचे ब्लडप्रेशर वाढले आहे आणि त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीतील रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच अयोध्येत शिवसेनेला रोखण्याचे कारस्थान होत आहे.

- Advertisement -

आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून आणि देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे. ते काही राजकारण करण्यासाठी नाही. रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे आणि निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही. आम्ही ‘चलो अयोध्या’चा नारा दिलेला नाही तर रामदर्शनासाठी अयोध्येत निघालो आहोत असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे, अशी भूमिका अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारने राममंदिर निर्माणाची तारीख घोषित करावी

बाबराचे राज्य हातोड्याने उद्ध्वस्त करण्याचे कार्य शेवटी बाळासाहेबांच्या वीर शिवसैनिकांनी पार पाडले. अशा शिवसैनिकांचे भय, द्वेष वगैरे वाटण्याऐवजी सध्याच्या राज्यकर्त्यांना अभिमानच वाटायला हवा. पण अयोध्येत इतक्या शिवसैनिकांचे काम काय, त्यांचा काही अंतस्थ हेतू वगैरे नाही ना अशा शंका उपस्थित का कराव्यात? तसे करण्यापेक्षा मेहेरबान सरकारने राममंदिर निर्माणाची तारीखच घोषित करून सगळ्या शंकाकुशंका शरयूच्या पात्रात कायमच्या बुडवून टाकाव्यात. एक श्रद्धाळू म्हणून आम्ही अयोध्येस जात आहोत, असेही यात म्हटले आहे.

- Advertisement -

सभा घेणारच नव्हतो – खासदार संजय राऊत

उत्तर प्रदेश सरकारने शिवसेनेच्या सभेला परवानगी दिली नाही, त्यामुळे शिवसेना सभा घेणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावरही शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, आम्ही कधीच सभेसाठी परवानगी मागितली नव्हती. त्यामुळे सभा घेण्यााचा प्रश्नच उरत नाही. या दौर्‍यात उद्धव ठाकरे हे शरयू नदीच्या तीरावर आरती करणार आहेत आणि येथील लोकांशी संवाद साधणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

सरकारला वचनांचे स्मरण करून देणार – खा. सावंत

राममंदिर निर्माणाबाबत सरकारने जी वचने दिली, त्यांचा सरकारला विसर पडला आहे, त्यांची आठवण करून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत येत आहेत. यासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. २५ नोव्हेंबर रोजीच विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची हुंकार रॅली आहे. त्यांनी तो करावा, एकत्रित येऊन या हुंकाराला आकार द्यायला शिवसेना तयार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी दैनिक ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -