घरमुंबईशोभायात्रांनी होणार नववर्षाचे स्वागत

शोभायात्रांनी होणार नववर्षाचे स्वागत

Subscribe

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा होतो. यानिमित्ताने मराठी नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी स्वागतयात्रांच्या माध्यमातून केले जाते. पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करून देणारे खेळ आणि प्रात्यक्षिके या शोभायात्रांमधून दाखवले जातात. अशाप्रकारे मुुंबईत ठिकठिकाणी शहर आणि उपनगर येथे या शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा गिरगावच्या यात्रेत २० फूट उंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असणार असून महिला आणि युवतींचे अथर्वशीर्ष पठण, श्रीरामासमोर रामकथा गायन करणारे लव-कुश यांच्यावरील देखावा यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे, तर विलेपार्ले शोभायात्रेत ५७ फुटी गुढी विशेष आकर्षण असणार असून पाकिस्तानी दहशतवादावर हवाई हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक यांचे चलचित्र रथ या यात्रेचे वैशिष्ठ्य आहे, तर दादर पूर्व येथील शोभायात्रेसाठी सैराट फेम आर्चीची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भायखळा स्टेशन पश्चिम येथील यात्रेत पु.ल. देशपांडे यांच्या साहित्य संपदेवर आधारित चित्ररथ हे मुख्य आकर्षण असणार आहे. भांडुप पूर्व गणेश मंदिर येथील यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर होणार आहे. लालबाग – परळ गिरणगावच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीचा जागर दिसणार आहे.

- Advertisement -

शोभायात्रेत भारतमातेच्या पालखीचा मान महिलांना देण्यात येणार असून महिलांचे दांडपट्टा सादरीकरण, लेझीम पथकाचे सादरीकरण, कथक होणार आहे. कुर्ला सर्वेश्वर मंदिर येथून निघणार्‍या यात्रेत कारगील विजयाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच बालाकोट येथील हवाई दलाच्या शौर्याचे प्रतीक म्हणून नववर्ष यात्रेत शौर्याची गुढी उभारण्यात येणार आहे. त्यावेळी कुर्ल्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार होणार आहे. तर मुलुंड राजे संभाजी सभागृह अरुणोदय नगर येथील शोभायात्रेत मराठमोळ्या खेळांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न होणार आहे. मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांना मराठी खेळाचे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -