घरCORONA UPDATEधक्कादायक! कोविडवरील लसींचा काळाबाजार!

धक्कादायक! कोविडवरील लसींचा काळाबाजार!

Subscribe

कोविडच्या विषाणूरोधी अर्थात अँटी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टोसिलिझुमॅब आणि रेम्डेसिव्हिर या सारख्या औषधांचा एक महिन्याचा आगाऊ साठा करून ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असले तरी या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. परिणामी खासगी रुग्णालयात या लसींच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांना लुटले जात आहे. त्यामुळे या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी खासगी रुग्णालयात ही लस महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास याचा काळाबाजार थांबून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट थांबेल, अशी मागणी पुढे येत आहे.

मुंबई महापालिकेकडे ३ हजार रेम्डेसिव्हिर इंजेक्शनचा अर्थात लसीचा साठा असून अजून १५ हजार लसींच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे उर्वरीत लसींचा साठा लवकरच प्राप्त होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच समर्पित उपचार केंद्रांमध्ये दाखल असलेल्या कोविड बाधित रुग्णांना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत, याकरिता दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घेऊन टोसिलिझुमॅब, रेम्डेसिव्हिर यासारख्या आवश्यक त्या औषधांचा महिन्याभरासाठीचा अग्रीम व पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर संबंधित प्रक्रियेनुसार उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त दिले होते. परंतु या दोन्ही औषधांचा सध्या मोठा तुटवडा आहे. त्याचाच फायदा काही खासगी रुग्णालय उठवत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिकेने या औषधांची खरेदी करून ती खासगी रुग्णालयात उपलब्ध करून दिल्यास सध्या होणारा काळाबाजार थांबू शकतो. या दोन्ही लसींची मागणी ही औषध दुकानात केल्यानंतर ती लस २४ तासानंतर उपलब्ध होते. त्यामुळे कोविड बाधित रुगणांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होते. त्यातच या औषधाचा तुटवडा असल्याने काही वितरक हे दुप्पट ते तिप्पट दरात ही औषधे विकतात. त्यामुळे महापालिकेने ही औषधे काही केंद्र सुरू करून तेथूनच ती उपलब्ध करून दिल्यास रुग्णाला वेळीच याचा उपचार करून देता येईल आणि रुग्णाचा मृत्यू दर कमी होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

सध्या सर्व खासगी रूग्णालयात महापालिकेचे ऑडिटर नेमलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत बिलांची तपासणी केली जाते. त्यामुळे खासगी रुग्णालयात या लसींची रक्कम त्यांना आकारता येणार नाही, अशा प्रकारच्या अटींचा समावेश करण्यात यावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. ही लस दोन प्रकारे उपलब्ध होते. एक होते पावडर स्वरूपात आणि एक लिक्विड स्वरूपात. रेडिमेड इंजेक्शन आणि पावडर इंजेक्शन हे बॉटल आयव्ही सेटच्या माध्यमातून दिले जाते. रेम्डेसिव्हिर ही लस रुग्णाला सात वेळा तर टोसिलिझुमॅब ही एकच लस द्यावी लागते. रेम्डेसिव्हिर ही लस पाच हजारांपर्यंत उपलब्ध होते. त्यामुळे अशा प्रकारच्या सात लसींकरता ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. परंतु या लसी दुप्पट दराने तर टोसिलिझुमॅब या लसीची मूळ किंमत ३१ हजार ५०० रुपये असून काळाबाजारात ही रक्कम ७० ते ७५ हजारांपर्यंत विकली गेल्याचेही जाणकारांकडून बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -