घरमुंबईट्रॉमा रुग्णालयात दीड तासांत ऑक्सिजनअभावी सात जणांचे मृत्यू!

ट्रॉमा रुग्णालयात दीड तासांत ऑक्सिजनअभावी सात जणांचे मृत्यू!

Subscribe

मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मात्र, कोरेानाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने अत्यंत चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना लावण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटर्सला कमी दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने मृत्यू पावण्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब समोर आली. ऑक्सिजनच्या बाटलांची वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे याचा पुरवठा आता कमी होऊ लागला असून मागील आठवड्यात केईएम, शीव, नायरसह जोगेश्वरी ट्रामा केअर सेंटरमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

जोगेश्वरी येथील मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला. तांत्रिक कारणांमुळे ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे फक्त दीड तासात सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी रुग्णालयात एकही तज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हता. मागील आठवड्यापासून हा प्रकार सुरु असून ट्रामा केअर सेंटर बरोरबच प्रमुख रुग्णालय असलेल्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयातही अशाच प्रकारे आयसीयूमध्ये दाखल असलेले रुग्ण हे व्हेंटिलेटर्सला कमी दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याने मृत पावल्याचे बोलले जात आहे. ट्रामामध्ये ही घटना घडण्यापूर्वी अशाच प्रकारे केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी दाबाने झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. व्हेंटिलेटर्सला ज्या क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे होत नाही. त्यामुळेच या घटना घडत आहे.

- Advertisement -

रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकल गॅस पाईप लाईनमधून होतो. ऑक्सिजनचा एक बाटला संपण्यास दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्येक बाटल्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर बीप वाजतो. त्यानंतर त्वरील बाटला बदलणे आवश्यक असते. परंतु कामगारांकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळेही या समस्या उद्भवतात असे बोलले जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या बाटलांची मागणी वाढत चालली असून त्यातुलनेत याचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे याचाही अभाव मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दिसून येत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जोगेश्वरीतील भाजप नगरसेवक पंकज यादव यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह त्यांनी ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. यामध्ये आठवड्यात २३ ते २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी ३ रुग्णांचा मृत्यू होतो. परंतु शनिवारी मध्यरात्री दोन तासांमध्ये सात जणांचा मृत्यू हा तांत्रिक कारणांमुळेच घडलेला आहे. ट्रामा केअर रुग्णालयातील ऑक्सिजन वितरण प्रणाली जुनी झाली आहे. तसेच गॅस बाटला त्वरीत बदलणे आवश्यक असते. परंतु याठिकाणी योग्य प्रकारे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते, असे यादव यांनी म्हटले आहे. त्यामुळे ट्रामा केअर रुग्णालयासह प्रमुख रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -