श्रीकांत शिंदेंची दिल्लीची वाट,रोखण्याचा राष्ट्रवादीचा आटापिटा !

राष्ट्रवादी - मनसे एकत्र लढल्यास शिवसेनेची वाट बिकटच ...., मनसेकडून राजू पाटील तर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड चर्चेत

Mumbai
MP Shrikant shinde
डॉ. श्रीकांत शिंदे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ठ्या महत्त्वाचा मतदारसंघ म्हणूनच कल्याण लोकसभेकडे पाहिलं जात. आघाडीच्या जागा वाटपात कल्याण हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राष्ट्रवादीने विशेष लक्ष दिलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेशी युती करण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादी व मनसे एकत्र आल्यास शिवसेनेसाठी ही निवडणूक कठीण ठरणार आहे. शिंदेची दिल्लीची वाट रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी पालघर हे चार लोकसभा मतदारसंघ येतात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ठाणे, कल्याण हे राष्ट्रवादीच्या ताब्यात तर भिवंडी, पालघर हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहेत. ठाणे जिल्ह्यात मनसेची ताकद आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मनसे उमेदवाराला लाखाची मते मिळाली आहेत. शरद पवार यांना पंतप्रधान बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यासाठी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात ठाणे आणि कल्याणच्या जागेकडेही शरद पवार यांनी विशेष लक्ष दिलं. ठाण्यातून गणेश नाईक तर कल्याणातून जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक लढवावी असा पवार यांचा आग्रह असल्याचेही समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नाईक-आव्हाडांची नावे चर्चिली गेली. मात्र ठाणे आणि मुंबई परिसरात मनसेची व्होट बँक आहे.

मनसेच्या उमेदवाराला एक लाखाच्या आसपास मते मिळाली आहेत. त्यामुळे आघाडीत मनसेला घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त बैठकही पार पडली. मात्र अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र मनसे राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील काही जागा मनसेला देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मनसे कल्याण, नाशिक आणि मुंबईतील उत्तर पूर्व मतदारसंघ जागेची मागणी केल्याचेही समजतंय. कल्याण आणि मुंबईची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने हिरवा कंदील दिला आहे, मात्र नाशिकला छगन भुजबळ हे लढणार आहेत. त्यामुळे ती जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याचेही सुत्रांनी सांगितले. मनसे राष्ट्रवादी युती झाल्यास कल्याण लोकसभेचे मनसेचे उमेदवार राजू पाटील हे असणार आहेत. तसेच मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ मनसेला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीची असल्याचीही समजते. सध्या किरीट सोमय्या खासदार आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मनसेशी युती करून बेरजेचे राजकारण करण्याची शरद पवार यांची रणनीती आहे.

कल्याणचे राजकीय समीकरण बदलू शकते

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांना ४ लाख १० हजार ८९२ मते मिळवून विजयी झाले होते, मात्र मोदी लाटेत दिग्गजांना फटका बसला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार १४३ मते तर मनसेचे राजू पाटील यांनी १ लाख २२ हजार ३४९ मते पटकावली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे २ लाख १२ हजार ४७६ मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत वसंतराव डावखरे यांना १ लाख ८८ हजार २७४ मते मिळाली तर मनसेच्या वैशाली दरेकर यांनीही १ लाख २ हजार ६३ मते मिळवली होती. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेची एक लाख मते आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळेच सेनेच्या उमेदवारांची मते दुपटीने वाढली होती. आता मात्र मोदी लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी युतीने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here