घरमुंबईम्हाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये लवकरच एकसमान भाडे

म्हाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये लवकरच एकसमान भाडे

Subscribe

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणार्‍या रहिवाशांसाठी एकसमान भाडे आकारणी करण्यासाठीचा निर्णय लवकरच म्हाडा प्राधिकरणाकडून अपेक्षित आहे. म्हाडाच्या मुंबई शहरात असणार्‍या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वेगवेगळे भाडे आकारणी होते. त्यामुळे म्हाडाकडे रहिवाशांकडूनच एकसमान भाडे आकारणी करण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी म्हाडाच्या इमारत दुरस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या काही बैठकाही पार पडल्या आहेत. त्यानुसार आता एकसमान भाडे आकारणीवर निर्णय होणार असल्याचे कळते.

म्हाडाचे संपूर्ण मुंबई शहरामध्ये ३८ ट्रान्झिट कॅम्प आहेत. पण या कॅम्पअंतर्गत घराच्या गाळ्याच्या क्षेत्रनिहाय भाड्याची आकारणी रहिवाशांकडून केली जाते. ही आकारणी काही ठिकाणी ३ हजार रूपये, काही ठिकाणी ६ हजार रूपये तर काही ठिकाणी १० हजार रूपयेही आहे. त्यामुळेच ही आकारणी एकसमान असावी अशी मागणी काही रहिवासी तसेच विकासकांकडूनही करण्यात आली होती. म्हाडाने काही रहिवाशांना नुकतेच ३ हजार रूपयांऐवजी ६ हजार रूपये भरण्यासाठीची नोटीस पाठवली होती. या नोटीशीला आक्षेप घेत काही रहिवाशांना कोर्टाकडे न्याय मिळवण्यासाठी धाव घेतली आहे. म्हाडाकडून अतिरिक्त भाड्यासह पाठवलेली नोटीस ही चुकीने पाठवली गेली असल्याचे कळते. पण या सगळ्या घोळावर तोडगा काढण्यासाठी आता म्हाडाकडून एकसमान पद्धतीचे भाडे आकारणी होणार आहे. पण ती रक्कम किती असणार याबाबतचे अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.

- Advertisement -

म्हाडाच्या ३८ कॅम्पमध्ये सध्या २२ हजार १२२ गाळे आहेत. त्यापैकी १३ हजार ९२२ पात्र रहिवासी या गाळ्यात राहतात. तर ८०६७ घुसखोरांनी या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आश्रय घेतला आहे.

म्हाडाने ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांकडून थकबाकी वसुल करण्यासाठी नाना शकला लढवल्या आहेत. त्यामध्ये नुकताच भाडे अदा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा पर्याय रहिवाशांना देण्यात आला आहे. पण तरीही म्हाडाच्या रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर थकबाकी ठेवण्यात आली आहे. २०१० सालापासून आतापर्यंत म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांनी ११० कोटी रूपये थकवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -