घरमुंबईविनायकी सुरांची चिरस्मरणीय मोहिनी...

विनायकी सुरांची चिरस्मरणीय मोहिनी…

Subscribe

प्रसिद्ध भावगीत गायक विनायक जोशी यांच्या निधनाची बातमी सर्वांच्याच मनाला चटका लागून गेली. इंदोरची संगीत मैफल आटोपून ते सहकार्‍यांसह बसने डोंबिवलीत येत असताना, वाटेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. इंदोरची संगीत मैफल ही विनायक जोशींची शेवटची ठरेल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. ‘सरीवर सरी’ या कार्यक्रमातूनच विनायक जोशी यांची ओळख जगाला झाली. ‘मेंदीच्या पानावर’, ‘सरींवर सरी’ अशा अनेक कार्यक्रमातून विनायक जोशी यांनी रसिकांच्या मनात अढळपद मिळवले होते. एक उत्तम सूत्रसंचालक, निवेदनकार म्हणूनही त्यांची ओळख हेाती. गायन क्षेत्रातील कामगिरीबद्दल गेल्याच वर्षी त्यांना आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित केले होते. चतुरंग प्रतिष्ठानच्या उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. डोंबिवलीत अनेक साांगीतिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असायचा. त्यांचे कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असायचे. विनायक जोशी हे शरीररूपाने आपल्यात नसले तरी त्यांच्या सुरांची मोहिनी कायमच राहणार आहे.

डोंबिवलीत वर्तमानपत्रात बातमीदारी करताना अनेक कार्यक्रमातून विनायक जोशींना ऐकायला मिळालं. अनेकदा त्यांच्याशी भेटही व्हायची. नेहमी हसरा चेहरा, शांत आणि प्रेमळ स्वभाव, गाण्यावर आणि सुरांवर अपार श्रध्दा असलेला हा गायक होता. त्यांच्या गप्पातून हे नेहमीच जाणवत असे. बँक ऑफ इंडियात ते नोकरीला होते. नोकरी सांभाळून त्यांचा सांगितिक प्रवास सुरू होता. पंडित एस. के. अभ्यंकर यांच्याकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. संगीतकार बाळ कर्वे, दशरथ पुजारी यांच्याकडून सुगम संगीताचे आणि गझल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले हेाते. सुरुवातीला स्वरांकन, अक्षयगाणी, वसंतबहार, सुधीर फडके सांगीतिक दर्शन, सरींवर सरी या वाद्यवृंदातून देशभर त्यांनी शेकडो कार्यक्रमांतून गायन केले. ‘स्वरांकन’ या सांगीतिक संस्थेपासून विनायक जोशी यांचा पहिला गायन प्रवास सुरू झाला होता. अनेक वर्षापासून त्यांचा सांगीतिक प्रवास सुरू होता. स्वरभाव यात्रा, सरींवर सरी, बाबूल मोरा, चित्रगंगा, गीत नवे गाईन मी, तीन बेगम आणि एक बादशहा अशा सांगीतिक कार्यक्रमाचे जोशी हे संकल्पक होते. तसेच चतुरंग, सायंकाळी एक रांगोळी सुधीर फडके अमृत महोत्सव महाराष्ट्र कलावंत दरबार अशा अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमातून त्यांनी सहभाग घेतला. ” स्वरभाव यात्रा ” हे पुस्तकही प्रसिध्द आहे. सुधीर फडके यांच्या हिंदीतील योगदानाची दखल घेणार्‍या ‘ज्योति कलश झलके’ या कार्यक्रमाची निर्मिती-संकल्पना ही विनायक जोशी यांची होती. स्व. कुंदनलाल सहगल यांच्यावर आधारीत बाबूल मेारा हा कार्यक्रम तसेच सरींवर सरी या कार्यक्रमांमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. मराठी भावगीतांचा प्रवास उलगडणार्‍या ‘स्वरभाव यात्रा’ पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. नव्या कलाकारांना ते नेहमीच प्रोत्साहन देत असत, हे त्यांच्या स्वभावातील वैशिष्ठ्य होतं.

- Advertisement -

भाषाप्रभू पु. भा. भावे आणि ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्यामुळेच डोंबिवलीला साहित्यिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शन्नांची, भावेंची डोंबिवली अशी साहित्यक्षेत्रात या शहराची ओळख आहे. साहित्य नगरी हा मान पु. भा. भावे यांच्यामुळेच डोंबिवलीला मिळाला. भावेंनंतर डोंबिवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘श.नां’मुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात आणखीनच भर पडली आहे. भाषाप्रभू भावे मूळचे नागपूरचे पण डोंबिवली ही त्यांची कर्मभूमी ठरली. त्यांच्यानंतर कथाकार, नाटककार, पटकथाकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे शं. ना. नवरे, प्रभाकर अत्रे, नामवंत कवी द. भा. धामणस्कर यांच्यासारख्या साहित्यिकांनी डोंबिवलीची कीर्ती पताका उंच ठेवली. त्याशिवाय शामकांत अत्रे, वि. रा. आपटे, विद्याधर करंदीकर, ज. बा. कुलकर्णी, अनंतराव कुलकर्णी, कविवर्य मधुकर जोशी, शुक्राचार्य गायकवाड, प्रवीण दवणे, विनिता ऐनापुरे अशा अनेकांनी डोंबिवलीचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे. विशेष म्हणजे गोविंद विनायक करंदीकर तथा विंदा करंदीकर हेसुद्धा काही काळ डोंबिवलीत वास्तव्याला होते. नामवंतांच्या काव्य प्रतिभेला बहर आणणारी ‘काव्य रसिक मंडळ’ ही डोंबिवलीचीच. डोंबिवली ही कलाकारांची खाण समजली जाते. डोंबिवलीत शास्त्रीय व वाद्य संगीतात नावाजलेले नाव म्हणजे पंडित गजाननबुवा जोशी, ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी, कवी मधुकर भावे यांनी डोंबिवलीला वेगळे वैभव मिळवून दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवीत विनायक जोशी यांनी रसिकांच्या मनावर गारूड केलं. त्यामुळे विनायकी सुरांची मोहिनी कायमच चिरस्मरणात राहणार आहे.

भावगीत गायक विनायक जोशी यांनी रसिकांच्या मनात अढळपद मिळवले होते. एक उत्तम सूत्रसंचालक, निवेदनकार म्हणूनही त्यांची ओळख हेाती. गायन क्षेत्रातील कामगिरीबद्दल गेल्याच वर्षी त्यांना आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चतुरंग प्रतिष्ठानच्या उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. डोंबिवलीत अनेक साांगीतिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असायचा. त्यांचे कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असायचे. विनायक जोशीं हे शरीररूपाने आपल्यात नसले तरी त्यांच्या सुरांची मोहिनी कायमच राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -