मुंबई: सिरी रोडची पायवाटच राहू द्या, गाड्यांसाठीचा रस्ता करू नका

siri road malabar hill residents deamand to cm uddhav thackeray for footpath
मुंबई: सिरी रोडची पायवाटच राहू द्या, गाड्यांसाठीचा रस्ता करू नका

मलबार हिल येथील सिरी रोडची पायवाट पाय वाटच राहू द्या या ठिकाणी गाड्यांसाठी रस्ता करू नका, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बाबुलनाथ मंदिराच्या मागील बाजूने कमला नेहरू पार्ककडे जाणारी पायवाट वृक्षराजीने नटलेली आहे. या पायवाटेने गिरगाव चौपाटीकडून थेट कमला नेहरू पार्कपर्यंत येथील नागरिक सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारतात. हा निसर्गरम्य परिसर म्हणजेच सिरी रोड होय. पण आता दैनंदिनी वाहतुकीसाठी गाड्यांसाठी रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे.

या विरोधात २०१५ साली स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून येथील निसर्ग वाचल्यानंतर आता पुन्हा एकदा हा रस्ता करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने मलबार हिल मधील रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. हा रस्ता होऊ देऊ नका अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मलबार हिल मधील रहिवाशांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सिरी रोड संदर्भात पत्र लिहिले आहे.

या पत्रात सिरी रोडचा हा रस्ता नागरिकांच्या फिरण्यासाठी पायवाटच राहू द्यावे येथे रस्ता बनवून गाड्यांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी स्थानिक रहिवाशी प्रकाश मुन्शी यांनी केली आहे. ते या संदर्भात पाठपुरावा करीत आहेत. सिरी रोड हा भाग खऱ्या अर्थाने ग्रीन झोन आहे.

पण एका विकासकाने बॉम्बे गॅरेज आणि त्या परिसरातील मालमत्ता खरेदी केल्याने तिथे पोहोचण्यासाठी सिरी रोडच्या पायवाटेचा रस्ता केला जात आहे. सदर रस्ता झाला तर कमला नेहरू पार्क मधील लहान मुलांचे खेळण्याचे उद्याने उध्वस्त होईल. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा तसेच सामाजिक कार्यकर्त्या इंद्राणी मलकानी यांनीही रस्त्याला विरोध दर्शविला आहे आणि त्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. सदरचा रस्ता झाला तर दीडशे झाडांची कत्तल होईल त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात पत्र व्यवहार केला आहे. आम्ही या ठिकाणी रस्ता होऊ देणार नाही यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टचे विश्वस्त संजय शिर्के यांनी सांगितले.