घरमुंबई२० महिन्यात ६ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

२० महिन्यात ६ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड याचा प्रताप ३ आयएएस अधिकार्‍यांनी राठोडवर केलीय फौजदारी कारवाईची शिफारस पर्यटनमंत्री जयकुमार रावल घालतायत राठोडला पाठीशी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी. राज्यात पर्यटनाला चालना मिळावी आणि देशी-विदेशी पर्यटकांना राज्यातील सुंदर ठिकाणांना भेट देता यावी, निसर्ग अनुभवता यावा यासाठी राज्य सरकारने 1975 साली एमटीडीसीची स्थापना केली. मात्र सध्या एमटीडीसीच्या कार्यालयात पर्यटनाऐवजी सावळागोंधळ सुरू असून मंत्रालयातील सर्व खात्यांमध्ये पर्यटनाच्या फाईल्स फिरत आहेत. पर्यटनवाढीसाठी फाईल्स फिरत असत्या तर ठिक; पण न्याय व विधी विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि सरते शेवटी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला, एमटीडीसीत प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका अधिकार्‍याने सर्वांच्या नाकी नऊ आणले असून एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2018 पर्यंतच्या 20 महिन्यांच्या कालावधीत एक दोन नव्हे तर अर्धा डझन आयएएस अधिकार्‍यांच्या हातात काही महिन्यांच्या आतच बदलीचे आदेश पडले आहेत.

साधारणपणे आयएएस अधिकार्‍याची बदली किमान तीन वर्षांनंतर केली जाते. मात्र प्रशासकीय कामाचे कारण देत एमटीडीसीमध्ये आयएएस अधिकारी असलेल्या तीन व्यवस्थापकीय संचालक आणि तीन प्रधान सचिव यांची उचलबांगडी करण्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आशुतोष राठोड यांना यश आले आहे. दीड वर्षांतच वेगवेगळे फेस्टीवल भरवत खात्याचा लौकिक चांदा ते बांदा पसरवणार्‍या सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांच्याशिवाय मंत्री रावल यांचे पानही हलत नसल्याचे मंत्रालयात बोलले जाते. त्यामुळेच डोईजड होण्याअगोदर सहा आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत तात्काळ काढण्यात आले. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जुलै 2016 मध्ये पर्यटन खाते जयकुमार रावल यांच्याकडे आले. त्यानंतर पर्यटन वाढीबरोबर अनेक नवनवीन कल्पना रावल यांनी प्रत्यक्षात उतरविल्या. मार्च 201७ नंतर खर्‍या अर्थाने पर्यटन वाढीचे प्रयत्न झाले आणि फळाफुलांप्रमाणे अनेक फेस्टीवल्स मुंबईसह राज्यात सुरू झाले. यामागे एकच अधिकारी कार्यरत होते ते म्हणजे आशुतोष राठोड. मुळचे मुंबई विद्यापीठाचे क्लास वन अधिकारी, उपकुलसचिव पदावर राहिलेल्या राठोड यांनी विद्यापीठापेक्षा डेप्युटेशनवर काम करण्यात जास्त रस दाखवला. विद्यापीठातून एमएसआरडीसी त्यानंतर पुन्हा मुंबई विद्यापीठ. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर नव्यानेच खाते निर्माण झालेल्या कौशल्य विकास खात्यात संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे ओएसडी पदी नियुक्ती आणि सध्या राठोड एमटीडीसीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक पदावर आहेत.

- Advertisement -

मात्र राठोड खात्यात आल्यानंतर मागील 20 महिन्यांच्या काळात एमटीडीसीमध्ये सहा आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात व्यवस्थापकीय संचालक गोविंद राज, विजय वाघमारे, सुहास दिवसे तर प्रधान सचिव नितीन गद्रे आणि विजय कुमार गौतम यांचा समावेश आहे. 6 नोव्हेंबर 2018 पासून व्यवस्थापकीय संचालक म्हणून अभिमन्यू काळे यांनी पदभार सांभाळला आहे तर प्रधान सचिव म्हणन 15 नोव्हेंबरपासून विनिता वेद सिंघल यांच्याकडे प्रधान सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघाल्यानंतर विजयकुमार गौतम यांनी एमटीडीसीचा पदभार २० नोव्हेंबरपर्यंत सोडलेला नाही आणि विनिता सिंघल यांनी पदभार घेतलेला नाही. राठोड खात्यात आल्यानंतर काही दिवसांतच प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांची बदली झाली होती हेही विशेष.

कारण एमटीडीसीत जो कोणी अधिकारी पर्यटन वाढीसाठी येतो तो काही महिनेच खात्यात टिकतो. तीन ते सहा महिन्यांच्या फरकानेच पाच अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. पराग जैन हे त्यामानाने नशीबवान ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण तेही काही महिनेच एमटीडीसीत टिकले पण तोपर्यंत राठोड यांची एमटीडीसीत एन्ट्री झाली नव्हती, अशी माहिती एका अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला दिली.

- Advertisement -

नुकताच भव्य दिव्य असा ‘मुंबई मेला- शॉपिंग फेस्टीव्हल’ मुंबईत पार पडला. पण त्यामध्ये एक वर्षाऐवजी पाच वर्षांचे कंत्राट देण्यामध्ये सहव्यवस्थापकीय संचालक राठोड यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे तत्कालीन संचालक वाघमारे आणि दिवसे यांनी हे नियमबाह्य असल्याचे सांगत पाच वर्षांचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली. तसेच राठोड यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत खात्यांतर्गंत चौकशी करण्यात यावी, असेही सामान्य प्रशासन विभागाला कळवले. (आपलं महानगरकडे याबाबतचा सर्व पत्रव्यवहार आणि कागदपत्रे आहेत.) पाच वर्षांसाठी सुमारे 20 कोटींचे कंत्राट मेसर्स ओएकेस मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले होते. सकृतदर्शनी राठोड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत राज्याचे नुकसान केल्याचा ठपका प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी ठेवला आणि राठोड यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या परवानगीसाठी ऑक्टोबर 2018 मध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे फाईल पाठवली. मात्र त्या फायलीवर निर्णय घेण्याअगोदर 15 नोव्हेंबर रोजी गौतम यांच्या बदलीची ऑर्डर काढण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राठोड हे मूळचे विद्यापीठाचे असल्याने खात्यांतर्गत चौकशी विद्यापीठाने करायची की एमटीडीसीने याबाबत आदेश प्राप्त करणारी फाईलही सध्या सामान्य प्रशासन विभागात महिन्याभरापासून प्रलंबित आहे.

याबाबत प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांच्याशी संपर्क केला असता माझी त्या खात्यातून बदली झाली असून, मला या विषयावर काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले. तर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी त्यांच्या मंत्रालय नजिकच्या एमटीडीसीच्या कार्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, साहेब मिटींगमध्ये असल्याने प्रतिक्रियेसाठी भेटणार नसल्याचे मंत्र्यांच्या दालनातून सांगण्यात आले.

कोण आहेत आशुतोष राठोड 

मूळ विद्यापीठातील कर्मचारी

आशुतोष राठोड यांची नियुक्ती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव, जनसंपर्क विभाग या पदावर तात्कालिन कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या कारकिर्दीत झाली. त्यांनी आपले राजकीय वजन वापरून, माजी कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांच्या कारर्किदीत एमएसआरडीसी येथे प्रतिनियुक्ती करुन घेतली. याठिकाणी त्यांच्या कामकाजावर काही आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर ते पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठात आपल्या मूळ पदावर रुजू झाले. त्यानंतर माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या काळात पुन्हा एकदा आपले राजकीय संबंध वापरून कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे ओएसडी म्हणून प्रतिनियुक्ती करुन घेतली. त्यावेळी डॉ. संजय देशमुख यांनी त्यास प्रचंड विरोध केला होता. आतापर्यंतच्या त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या निर्णयावरुन मुंबई विद्यापीठातही बराच वाद निर्माण झाला आहे. राठोड यांचे वडील नाशिकचे माजी जिल्हाधिकारी आहेत. तर त्यांचा एक नातेवाईक माजी राज्यमंत्री असल्याने राठोड यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे विद्यापीठात बोलले जाते.

प्रतिनियुक्ती वादात

राठोड यांचा आतापर्यंतचा नोकरीतील प्रवास वादाचा ठरला आहे. ते ज्याठिकाणी जातात त्याठिकाणी तेथील आस्थापन त्यांच्यावर कारवाई करते. त्या कारवाईची प्रत मुंबई विद्यापीठाला येते. यावर मुंबई विद्यापीठ काहीच करत नाही. वर्षानुवर्षे हा अधिकारी नियमबाह्य पद्धतीने प्रतिनियुक्तीवर असल्याने विद्यापीठाला कारवाई करताना अडथळा येत असून कारवाईच्या हालचाली सुरु झाल्यास लगचेच राजकीय दबाव वाढत असल्याची माहिती मुंबई विद्यापीठातून देण्यात आली. नियमानुसार शासकीय कर्मचार्‍यांना एवढी वर्षे प्रतिनियुक्ती दिली जात नाही. त्यामुळे त्यांची प्रतिनियुक्ती देखील वादात अडकणार आहे. त्याचबरोबर प्रतिनियुक्तीवर पाठवताना त्या अधिकार्‍याला लीन दिली जाते. राठोड यांची लीनही वादात अडकल्याची माहिती विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी आपल्यावर खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाची सध्या मीडिया ट्रायल सुरू असल्याचे ‘आपलं महानगर’ला सांगितले. तसेच माझ्या विरोधात जे काही सांगितले जात आहे ते कथित आरोप असून एकाही चौकशीत सिद्ध झालेले नाहीत, असा दावा केला आहे. व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सुहास दिवसे आणि प्रधान सचिव व्ही के गौतम यांनी मला माझी बाजू मांडण्याची संधी दिलेली नसून, आयएएस अधिकार्‍यांमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण आहे. मला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. माझे म्हणणे मागील 100 दिवसांत ऐकून न घेताच माझ्यावर भ्रष्टाचार,अपहार केल्याचा धादांत खोटा आरोप लावल्याचा दावाही राठोड यांनी केला. मला केवळ विजय वाघमारे यांनी कारणे दाखवा नोटीस दिली, तीही आकसापोटी. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे मी ओएसडी असताना वाघमारे यांची अनेक वादग्रस्त प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच त्यांनी माझ्यावर कारवाई केल्याचेही राठोड यांनी सांगितले. मी कोणताही अपहार केला नसून, कोणत्याही चौकशीला सामोरे जायची माझी तयारी आहे. मंत्री महोदय जयकुमार रावल यांनी मीडियाला माहिती देताना कोणतीही खोटी माहिती देवू नकोस,अशी ताकिद दिल्याचेही, राठोड यांनी सांगितले.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -