मुंबईत 98 कॉलेजांमध्ये वाढणार सहा हजार जागा

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Mumbai
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्य बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल घसरल्याने एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमधील प्रवेशाचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्येे प्रवेश मिळावा यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील नामांकित कॉलेजांमधील जागा वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील तब्बल 98 कॉलेजांमध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी सहा हजार 622 जागा वाढवण्यात येणार आहे. इतक्या जागा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा बंद केल्याने त्यांना भाषा व समाजशास्त्र या विषयामध्ये 100 गुणांचे पेपर द्यावे लागले. त्याचा परिणाम त्याच्या गुणांवर झाल्याने यंदा एसएससी बोर्डाचा निकालात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशाचे मार्ग बिकट झाला होता. यावर सरकारने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी गुणांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. परंतु याला पालकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. यामुळे पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून अकरावीच्या अतिरिक्त तुकड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.

विद्यार्थ्यांची होणारी कोंडी लक्षात घेत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा कल असलेल्या ज्यूनियर कॉलेजमधील सायन्स शाखेसाठी पाच तर आर्ट्स आणि कामर्स शाखेसाठी आठ टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या क्षेत्रातील तब्बल 98 कॉलेजांमध्ये सहा हजार 622 जागा वाढवण्यात येणार आहेत. सरकारकडून वाढवण्यात येणार्‍या या जागांमध्ये कॉमर्सच्या सर्वाधिक चार हजार 226 जागा वाढणार आहेत. त्यामध्ये अनुदानित कॉलेजमध्ये दोन हजार 875 तर विनाअनुदानित कॉलेजमध्ये एक हजार 351 जागा वाढणार आहेत.

त्याखालोखाल सायन्सच्या एक हजार 243 जागा वाढणार असून, त्यातील 953 जागा अनुदानित तर 290 जागा विनाअनुदानित कॉलेजमध्ये वाढणार आहेत. आर्ट्सच्या एक हजार 153 जागा वाढणार असून यातील 1103 जागा अनुदानित तर 50 जागा विनाअनुदानित कॉलेजांमध्ये असणार आहे. सरकारकडून वाढवण्यात येणार्‍या या जागांमुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शाखा टक्के प्रस्तावित वाढीव जागा अनुदानित विनाअनुदानित
आर्ट्स 8 1153 1103 50
कॉमर्स 8 4226 2875 1351
सायन्स 5 1243 953 290
एकूण 6622 4931 1691