घरमुंबईस्मार्ट ठाण्यात चौकांचे पावित्र्य हरवतंय

स्मार्ट ठाण्यात चौकांचे पावित्र्य हरवतंय

Subscribe

चकाचक रस्ते आणि आकर्षक चौक हे शहराच्या सौंदर्यात भर घालत असतात, पण स्मार्ट शहराचे स्वप्न पाहणार्‍या ठाण्यात चौक दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. शहरातील चौकांची दुरवस्था झाली असून ते केवळ नावापुरतेच ठरत आहेत. अनेक चौकांना संतांची आणि महापुरुषांची नावे आहेत. मात्र या नावांचे पावित्र्य हरपत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच चौकांचे सौंदर्य फुलविण्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देईल का ? असाच प्रश्न ठाणेकरांमध्ये उपस्थित होत आहे.

ठाणे शहरात चौकांच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न अनेकवेळा झाला आहे. त्या चौकांचे नामकरण झाल्यानंतर त्यांचे सौंदर्य कायम राहील याकडे पालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिलेलं नाही. त्यामुळे सध्या चौकांची खूपच दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. एकीकडे स्मार्टसिटीच्या नावाखाली सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. मात्र मूळ ठाण्यातील नौपाडातील चौक दुर्लक्षिलेली दिसतात. ठाण्यातील जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी चौकांची दुर्दशा समोर आणली आहे. विशेष म्हणजे शहरातील चौकांना युगपुरुष, संत महात्मे, प्रसिध्द कवी, लेखक, श्रध्दास्थाने तसेच शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्‍या व्यक्तींची नावे चौकांना दिली आहेत. चौकांचे नामकरण विधी मोठ्या थाटामाटात पार पडले. तिथल्या कोनशिलेवर तत्कालीन लोकप्रतिनिधींची नावे आहेत.

- Advertisement -

मात्र सध्या शहरातील सर्व चौक कोनशिला नामफलक दुर्लक्षिलेले दिसतात. त्यांची साफसफाई दूरच, त्यावर जाहीराती चिकटविल्या जातात. त्यामुळे चौकांची बिकट अवस्था झाल्याची दिसून येते. सुशोभित चौक हे शहराच्या सौंदर्यात भर टाकतात. त्यामुळे पक्षविरहित दृष्टीकोन ठेवून विद्यमान लोकप्रतिनिधींनी चौकांच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे असून, त्यांची जुनी ओळख कायम राहावी, अशीच माफक अपेक्षा आहे. असे मत मोने यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता तरी ठाणे महापालिका प्रशासन दुरवस्था झालेल्या चौकांचा मेकओव्हर करेल का? असा प्रश्न ठाणेकरांमध्ये उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -