घरमुंबईधावत्या लोकलमध्ये निघाला साप, बाप रे बाप!

धावत्या लोकलमध्ये निघाला साप, बाप रे बाप!

Subscribe

गुरुवारी मुंबईच्या लोकलमधल्या प्रवाशांना भेटायला एक विशेष प्रवासी आला होता. पण त्या प्रवाशाला बघितल्यावर इतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. आणि एरव्ही धक्काबुक्की करणाऱ्या मुंबईकरांनी या प्रवाशाला मात्र उतरायला रीतसर जागा करून दिली!

सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईतल्या कोणत्याही लोकलमध्ये गर्दीशिवाय काहीही दिसणार नाही इतकी खचाखच लोकं भरलेली असतात. जागांची अॅडजस्टमेंट करण्यात मुंबईकरांचा प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. एरवी इतर सहप्रवाशांना ‘आगे चलो, उधर खिसको, नीचे देख ना जरा, धक्का कायको देता है’ असं म्हणत आरडाओरडा करणारा मुंबईकर लोकल प्रवासी गुरुवारी सकाळी मात्र गप्पगार झाला होता. टिटवाळ्याहून सीएसटीकडे येणारी लोकल सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे स्टेशनवर आली. रोज ही लोकल ठाण्यात आल्यानंतर प्रचंड गोंधळ, गडबड आणि आरडाओरडा सुरु होतो. पण गुरुवारी मात्र हे प्रवासी अगदीच थंड पडले होते. कारण त्यांना एका भलत्याच प्रवाशाला जागा करून द्यावी लागली!

…आणि पंख्यातून बाहेर आला साप!

टिटवाळा-सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकात आल्यानंतर अचानक फर्स्ट क्लासच्या डब्यातून काही काळ शांतता आणि नंतर मोठा गोंधळ ऐकू यायला लागला. पण हा गोंधळ इतर मुंबईकर प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी नसून या डब्यात चढलेल्या एका नव्याच प्रवाशाला खाली उतरवण्यासाठी होता. कारण डब्यात चक्क साप शिरला होता!

- Advertisement -

एका प्रवाशाने पंखा लावण्याचा प्रयत्न केला. पण अचानकच पंख्यातून हिरव्या रंगाचं काहीतरी खाली लटकायला लागलं. ते नक्की काय आहे याचं कुतूहल प्रवाशांमध्ये निर्माण होण्याइतकाही वेळ न जाता उपस्थित सर्व प्रवाशांचा तो हिरवा प्रकार म्हणजे हरणटोळ जातीचा साप असल्याचा साक्षात्कार झाला! आणि मग सुरू झाला या अनाहूत प्रवाशाला डब्यातून खाली उतरवण्यासाठीचा खेळ!

अनाहूत प्रवाशाला उतरवले खाली!

ज्या प्रवाशाने पंखा लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यानेच डब्यातल्या इतर प्रवाशांना संभावित धोक्याची कल्पना दिली. मग कुठूनतरी एका प्रवाशाने काठी आणली आणि पंख्यावर उलटा लटकून आरामात हवा खाणाऱ्या साप महोदयांना खाली खेचण्याचा प्रयत्न करू लागला. महत्प्रयासांनंतर पंख्यावर चढलेले हे प्रवासी खाली खाली आले. या सापाला मग काठीनेच डब्यातून बाहेर काढून रेल्वे रुळालगतच असणाऱ्या नाल्यात फेकून देण्यात आलं.

- Advertisement -

वास्तविक डब्यात साप सापडला म्हणून मोटरमननं लोकल जागीच थांबवली होती. पण हरणटोळ या जातीचा हा साप निरुपद्रवी आणि बिनविषारी असल्याचं एका प्रवाशानं लक्षात आणून दिलं. त्यामुळे धोका टळल्याचं पटल्यानंतर मोटरमनने लोकल सीएसएमटीकडे रवाना करावी अशी विनंती त्याने मोटरमनला केली. मग साप सापडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ही लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन की आपण?

जंगलांकडे झालेलं मानवाचं अतिक्रमण या वन्य प्राण्यांना शहरांकडे येण्यासाठी प्रवृत्त करत आहे. नव्हे, नाईलाजानेच हे प्राणी शहरांकडे येत आहेत. त्यामुळे, माणसांनीच अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र हे जरी खरं असलं, तरी हा साप नक्की लोकलमध्ये आलाच कसा? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत होते. त्याचबरोबर, जर या सापाऐवजी एखादा विषारी साप असता, तर नसती दुर्घटना घडली असती आणि मग त्याची जबाबदारी कुणी घेतली असती? लोकलच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या रेल्वे प्रशासनानं की वाट्टेल तशी जंगलतोड करणाऱ्या मानवप्राण्यानं? हा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -