प्रचाराची रणधुमाळी समाज माध्यमांवरचं

प्रखर उन्हाळ्यामुळे निवडणूक प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. एकूणच राजकारणाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये निरुत्साह असल्याचाही हा परिणाम आहे.

Mumbai

प्रखर उन्हाळ्यामुळे निवडणूक प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. एकूणच राजकारणाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये निरुत्साह असल्याचाही हा परिणाम आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी समाज माध्यमांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाचा आवाका पाहता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्यापेक्षा व्हॅटस्अ‍ॅप आणि फेसबुकद्वारे प्रचार करणे सोयीचे ठरू लागले आहे. मॉर्निंग वॉकच्या वेळी नागरिकांशी संपर्क साधून उमेदवार त्या क्लिप्स तात्काळ व्हॉट्अ‍ॅपद्वारे व्हायरल करू लागले आहेत. तसेच यु-ट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातूनही प्रचाराला उधाण आले आहे. सध्या बहुतेक युवकांच्या हाती स्मार्ट फोन आहेत. त्यामाध्यमातून प्रचार करणे उमेदवारांना सोयीचे ठरू लागले आहे. प्रभागनिहाय विविध समूह बनवून त्याद्वारे उमेदवारांची माहिती आणि महती पटवून दिली जात आहे.

समाज माध्यमावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खास मीडिया सर्टिफिकेशन कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई केली जाईल.
– अनिल पवार, निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे

व्हाट्सअ‍ॅपवर ब्रॉडकास्ट लिस्ट करून प्रत्येकाला वेगळा संदेश जाईल, याबाबतही दक्षता घेतली जात आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात बहुतेक ठिकाणी विनामूल्य वायफाय सुविधा आहे. प्रचार संदेश पाठवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. राजकीय पक्षांनी त्यासाठी विभागनिहाय वॉररूम्स तयार केल्या आहेत. या माध्यमातून आपल्या उमेदवाराची जमेची बाजू सांगण्याबरोबरच विरोधी उमेदवाराच्या मर्मावर बोट ठेवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे समाज माध्यमात वाद प्रतिवादाचे युद्ध रंगले आहे. त्याचा गैरवापरही होऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here