मारहाणीचा हक्क शिवसैनिक महिलांना दिला कोणी ?

Mumbai
Nita Bansode

एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी तुषार बनसोडे यांना ७ जानेवारीला काही महिलांनी मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तुषार यांना मानपाडा पोलीसांनी अटक केली. मात्र याप्रकरणी तुषार यांच्या पत्नी निता बनसोडे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत, माझ्या पतीची जर चूक असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे होते. परंतु धिंड काढून मारहाण करणे कितपत योग्य आहे. मारहाण करण्याचा अधिकारी शिवसेनेच्या महिलांना दिला कोणी ? त्यांच्यावरही कारवाई करा, अन्यथा मी कुटूंबासह आत्महत्या करेन, असा इशारा दिला.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात तुषार बनसोडे यांचे इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे, ७ जानेवारीला महिलेची छेड काढल्याचा आरोप करीत काही महिलांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तुषार बनसोडे यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. यावेळी निता बनसोडे यांनी सांगितले की, माझ्या पतीवर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. ज्या महिलेची छेड काढण्यात आली होती, मग त्या महिलेने पोलिसात तक्रार का केली नाही ?, असा सवाल निता बनसोडे यांनी उपस्थित केला. त्या महिलेने शिवसैनिक महिलांना सोबत घेऊन माझ्या पतीला भररस्त्यात मारहाण केली. इतकेच नव्हे तर घरापर्यंत मारहाण करत धिंड काढली. समाजात आमची बदनामी झाली. आम्हाला दोन लहान मुले असून माझे पती तुरूंगात असल्याने आमचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता कायदा हातात घेणार्‍या त्या महिलांवर कारवाई करून न्याय मिळावा, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here