घरमुंबई‘मोठे’पणाचे भान आणि जाण!

‘मोठे’पणाचे भान आणि जाण!

Subscribe

नववर्षाच्या सुरूवातीला आजपासून पुन्हा नव्या रुपात आणि मोठ्या आकारातील ‘आपलं महानगर’ आपल्या भेटीला येत आहे. म्हणजेच आम्ही पुन्हा ब्रॉडशीटवर येत आहोत. २ जुलै २०१८ रोजी ‘महानगर’ मोठ्या आकारातून लहान आकारात रुपांतरित झाला होता. सुमारे तीन दशके मुंबईकरांचा आवाज असलेले नि:पक्षपाती एकमेव दैनिक अशी ‘महानगर’ची ख्याती आहे. त्यासाठी आम्ही अविरत कार्यरत आहोत. या प्रवासात अनेक अडचणी, अडथळे होते. मात्र वाचकांची साथ आणि त्यांनी वारंवार दिलेल्या पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाला. हे सर्व करत असताना काळाची पावले ओळखणेही गरजेचे असते. काळानुसार बदलावे, हा निसर्ग नियम होय. काळानुसार बदलाची अपेक्षा ‘महानगर’चा वाचक आत्मियतेने आणि तळमळीने करत होता. हे बदल करताना अनेक मतमतांतरे आणि विचारप्रवाहही होते. ते स्वीकारत आम्ही पुढे जात आहोत.

हे बदल करताना म्हणजेच ‘महानगर’चा आकार बदलताना त्यातील बातम्या आणि मजकुरात कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. मुंबई आणि परिसरातील वाचकांनीही छोट्या आकारातील ‘महानगर’ला डोक्यावर घेतले आहे. इतरांकडे नाही किंवा इतर कोणी ज्या बातम्या छापण्यास धजावणार नाहीत, अशा बातम्या आणि मजकूर आजवर लहान आकारात आम्ही दिला. तशाच बातम्यांचा ओघ मोठ्या आकारात कायम राखण्याची आमची बांधिलकी राहील. अर्थात त्यासाठी वाचकांची साथ आणि प्रेम महत्त्वाचे होते. ते आपण कधीच कमी पडू दिले नाही, हे आम्ही प्रामाणिकपणे नमूद करतो. लहान आकारातील ‘आपलं महानगर’ वर्तमानपत्र नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्येही जात होते. तिथेही त्याला चांगला प्रतिसाद लाभत गेला. मागणी वाढत असताना अनेक वाचक ‘आपलं महानगर’च्या परिवाराला येऊन मिळत होते. वाढती स्पर्धा, महागाई, व्हिज्युअल मीडियातील वाढते आव्हान याचा सामना करताना वाचकांना धडाकेबाज, विश्वासार्ह आणि पडद्यामागे काय घडते आहे, याची माहिती ‘महानगर’ने वेळोवेळी दिली. माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात चोहीबाजूने माहितीचा मारा होत असताना नेमकी बातमीच हरवून बसली होती.

- Advertisement -

जे टीव्हीवर, मोबाईलवर दिसते, तिलाच बातमी समजले जात होते. मात्र ‘आपलं महानगर’ने त्याला छेद दिला. आतली बातमी देऊन ‘महानगर’ने दडलेली माहिती बाहेर काढली. वाचकांसाठी ती मोलाची ठरली. ‘आम्ही सांगतो पाणी कुठे मुरतेय’ हे आम्ही नेमकेपणाने सांगितले. हे करताना सकारात्मक बातम्याही वाचकांपुढे आणून त्यांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. माहिती देताना त्यातील बातमी दडपून टाकण्याच्या या युगात आम्ही लोकांपुढे बातम्या आणल्या. माहितीची सत्य-असत्यता वाचकांना पटवून दिली.

आजपासून ‘महानगर’ मोठ्या आकारात येत आहे. या आकारातील अनेक वृत्तपत्र सध्या बाजारात आहेत. मग तुम्ही काय वेगळे करणार, असा प्रश्न वाचकांना पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर आम्हाला सापडले म्हणूनच पुन्हा मोठ्या आकारात येण्याचे धाडस आम्ही करतोय. आम्ही आमचा बाणा, लढाऊ वृत्ती सोडलेली नाही. ती कायम ठेवताना ‘महानगर’ने आजवर दिल्या तशाच आतल्या बातम्या आम्ही यापुढेही देत राहू, याची खात्री देत आहोत. आता आपले हे वर्तमानपत्र मोठ्या आकाराचे झाल्यामुळे आपली बातम्यांची भुकही आम्हाला भागवता येणार आहे. मोठे वर्तमानपत्र आणि अधिक बातम्या हे आमच्यावर प्रेम करणार्‍या आमच्या असंख्य वाचकांसाठी आम्ही घेतलेले व्रत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या १८ जानेवारीपासून ‘महानगर’ मुंबई, ठाणे, पालघर, रायगडपर्यंतची कक्षा विस्तारत नाशिकला पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. तसा आग्रह आमच्या वाचकांनी धरल्यामुळेच आम्हाला हे शक्य झालेले आहे. त्यामुळे मोठेपणाचे भान आणि जाण ओळखून आतापर्यंत आपण आमच्यावर जसे प्रेम केले तसेच यापुढेही हे प्रेम कायम राहील याचा, आम्हाला विश्वास आहे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -