भाजपा नगरसेवकाकडून २३ मेसाठी ५०० किलो लाडूंची ऑर्डर

एक्झीट पोलमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर एका बाजूला वरिष्ठ पातळीवर भाजपामध्ये राजकीय खलबतांना वेग आला असतानाच दुसऱ्या बाजूला संभाव्य विजयाची तयारीही सुरू आहे. मुंबईतील भाजपाचे नगरसेवक अतुल शाह यांनी मागच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही लाडू वाटप करून हा विजय साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी ५०० किलो लाडूंची ऑर्डरही दिली आहे.

गिरगावातील प्रसिद्ध हलवाई गणेश मिठाई भांडार यांच्याकडे आज दुपारनंतर हे लाडू तयार होण्यास सुरूवात होणार आहे. २३ पर्यंत हे मोतीचूर लाडू वाटण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अतुल शाह हे भाजपाचे नगरसेवक तसेच प्रवक्तेही आहेत. २३ तारखेला सकाळी ८ वाजल्यापासूनच मुंबईच्या कस्तुरबा गांधी चौकात हे लाडू वाटण्यात येणार आहेत.

इस गुरूवार फिर एक बार मोदी सरकार’ अशी पंक्ती वापरून त्यांनी लाडवांचा संदेश शेअर केला आहे. श्री शाह यांनी २०१४ च्या निवडणूकीतही अशीच लाडवांची ऑर्डर दिली होती. त्यावेळेस त्यांनी ४० हजार किलो लाडू वाटले होते. त्यासाठी २००० किलो लाडवांची ऑर्डर त्यांनी गणेश मिठाईकडे दिली होती. २०१४मध्ये भाजपाला केंद्रात एकहाती सत्ता मिळविण्यात यश आले होते.