घरमुंबईकेईएममध्ये पावसाळ्यासाठी ‘स्पेशल फिवर’ ओपीडी

केईएममध्ये पावसाळ्यासाठी ‘स्पेशल फिवर’ ओपीडी

Subscribe

मुंबईतील वातावरणात झालेल्या बदलामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील वातावरणात आलेला थंडावा आणि हवेतील ओलसरपणा यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या तापाने मुंबई फणफणली आहे. जसजसा पावसाचा जोर कमी- जास्त होतो, तशी संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत जाते. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही तापासाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ज्या मुंबईकरांना कामावर जाण्याच्या घाईमुळे रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा मुंबईकरांसाठी ही स्पेशल फिवर ओपीडी सुरू करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला की खोकला, ताप, पोटदुखी, अंगदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे विशेष सोय म्हणून केईएममध्ये संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत विशेष ओपीडी सुरू करण्यात आल्याचे केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकदा तापावर घरगुती उपचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डॉक्टरांच्या मते, तापाकडे दुर्लक्ष केल्यास तो अधिक बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. ओपीडीनंतरही आपत्कालीन ओपीडीत रुग्ण येतात. त्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ती गर्दी कमी करण्यासाठीच पावसाळ्यात ही विशेष ओपीडी सुरू करण्यात येते, असे केईएमचे डॉ. आलोक सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

रुग्णांच्या संख्येत वाढ

ओपीडीत मेडिसीन आणि निवासी डॉक्टर्स उपलब्ध असतात. शिवाय एखाद्या व्यक्तीला जर जास्त ताप आला असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले जाते. हॉस्पिटलमध्ये येणार्‍यांची गर्दी कमी व्हावी यासाठी ओपीडीचा वेळ वाढवून घेण्यात आल्याचेही डॉ. सिंह सांगतात. पाऊस पडण्यापूर्वी दररोज ३० ते ३५ रुग्ण तपासणीसाठी येतात. परंतु पावसाला सुरुवात झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पाऊस पडल्यानंतर उद्भवणारे साथीचे आजार अद्याप पसरले नसले तरी रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि घशाचा संसर्ग असलेले रुग्ण अधिक असल्याचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. सुनील लांबे यांनी सांगितले. पाऊस पडतो, मधेच ऊन येते, या वातावरणाच्या फरकामुळे आजार वाढण्याची शक्यताही डॉ. लांबे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -