आईची हत्या करून बारबालांवर पैसे उधळले

तरुणाचे कृत्य समजल्यावर व्यथित झालेल्या आबांनी आणली डान्सबारबंदी

Mumbai
Dance bar

पनवेलमधील डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी एका तरुणाने आईची हत्या केली व त्यानंतर तिचे दागिने विकून ते पैसे बारबालावर उधळले तर दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची पदवी घेतलेल्या तरुणाने डान्सबारमध्ये उधळण्यासाठी पैसे नाहीत म्हणून चक्क लुटमारी करण्याचा मार्ग निवडला होता. या घटना जेव्हा तत्कालीन गृहमंत्री आबांच्या निदर्शनास आल्या, तेव्हा ते अतिशय व्यथित झाले होते. त्याचवेळी त्यांनी फार धाडसाने डान्सबार बंदीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, अशा आठवणींना उजाळा देत आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी डान्सबारविरोधी कायदा सक्षम झालाच पाहिजे असा पुनरुच्चार पनवेल मध्ये झालेल्या सभेत केला.

आबांना आल्या होत्या धमक्या
2013 मध्ये पुन्हा डान्सबार बंदी उठवण्यात आल्याने आबांनी सभागृहात कायदाच तयार केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. परंतु, 2005 मध्ये जेव्हा आबांनी बंदी आणली त्यानंतर आर. आर. पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आबांना याविषयी विचारले तर त्यांनी ती धमक्यांची पत्रे केराच्या टोपलीत टाकण्याचा सल्ला दिला, अशी आठवणही यावेळी पाटील यांनी करून दिली.

दोन्ही सभागृहात डान्सबारविरोधी कायदा करता येत असताना सरकारचे हात कुणी बांधले आहेत. युती सरकारची फूस असल्यानेच डान्सबार पुन्हा सुरू झाले आहेत, असा आरोप करून जर अधिवेशनापूर्वी सरकारने नव्याने सक्षम कायदा आणून डान्सबार बंदी आणली नाही, तर येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला मतदानच करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केले.

बंदी आणा अन्यथा डान्सबार फोडू
डान्सबारमध्ये सरकारला काहीही आक्षेपार्ह वाटत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या सभागृहात डान्सबार सुरू करावा, अशी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत डान्सबारविरोधी त्वरीत अध्यादेश काढा अन्यथा, प्रत्येक डान्सबारमध्ये घुसून तोडफोड केली जाईल, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.