कोळीवाड्यांच्या मुळावर एसआरए योजना

१९ कोळीवाड्यांची ओळख पुसली जाणार

Mumbai
कोळीवाडा

मुंबईच्या नव्या विकास आराखड्यात कोळीवाड्यांच्या परिसरात झोपडपट्टया दाखवून तेथील विकासाच्या नावाखाली कोळीवाड्यांचे अस्तित्वच नष्ट करण्यात येत आहेत. शीव कोळीवाड्यातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना या कोळीवाड्याची ओळखच पुसली जात आहे. मुंबईत अशाप्रकारे एकूण ४१ कोळीवाडे असून तेथील झोपडपट्टयांचा पुनर्विकास हा आता या कोळीवाड्यांच्या मुळावर उलटला असून तब्बल १९ कोळीवाड्यांचे अस्तित्व नष्ट होणार आहे.

शीव कोळीवाडा येथील राबवण्यात येणार्‍या एसआरए योजनेसाठी विकासकाची नेमणूक करण्यात आल्यानंतर, येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कोळीबांधवांना घरे खाली करण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे. त्यामुळे मुंबईचा आद्य नागरिक असलेल्या कोळी बांधवांना काळीवाड्यातील जागा सोडावी लागणार आहे. कोळीवाड्यांच्या जागा या कोळ्यांच्या मालकीच्या असल्याने तेथून हद्दपार केले जात असल्याने येथील कोळीबांधवांच्या कुटुंबांनी तीव्र विरोध केला आहे. या कोळीवाड्यांच्या जागा राबवण्यात येणार्‍या पुनर्विकासात कोळीबांधवांवर कारवाई करू नये,अशा प्रकारचे पत्र खुद्द भाजपाचे स्थानिक आमदार कप्तान आर.सेल्वन तसेच अ‍ॅड, निरंजन डावखरे तसेच मंदा म्हात्रे आदी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे कारवाईची गती थांबली असली तरी कोळीबांधवांवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मात्र, शीव कोळीवाड्याप्रमाणे पश्चिम उपनगरातील १५ कोळीवाड्यांसह मुंबईतील ४१ कोळीवाड्यांच्या मुळावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प योजना (एसआरए)उठलेली आहे.

सीआरझेडची सिमारेषा पुर्वीच्या तुलनेत ५० मीटरपर्यंत आणल्यामुळे कोळीवाड्यांच्या परिसरातील झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला झाला आहे. त्यातच आता सिमांकन करून कोळीवाड्यांच्या सिमारेषा निश्चित करून या झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला करून दिला आहे. त्यामुळे ४१ कोळीवाड्यांचे अस्तित्वच संपले जाण्याची शक्यता आहे. विकास आराखडा २०३४ चा प्रारुप आराखडा बनवल्यानंतर कोळीवाड्यांच्या जागांवर झोपडपट्ट्या दाखवल्या गेल्याची बाब ‘उद्री’सारख्या खासगी स्वयंसेवी संस्थांनी निदर्शनास आणून दिली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शीव कोळीवाड्यातील कोळी बांधवांना घरे खाली करण्याची नोटीस बजावल्यानंतर सर्वच कोळीवाड्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुळात जेव्हा विकास आराखडा बनवला जात होता, तेव्हाच आपण कोळीवाडे, गावठाणांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सध्या जो विकास आराखडा मंजूर झाला आहे, त्यामध्ये १८९गावठाण्यांच्या तुलनेत ५२ गावठाण आणि ४१ कोळीवाड्यांच्या तुलनेत २२ कोळीवाडे दाखवले आहे. त्यामुळे १२७ गावठाण आणि १९कोळीवाड्यांची संख्या कमी होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानंतर त्यासाठी विशेष विकास नियंत्रण नियमावली बनवणार असल्याचे जाहीर केले. यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून निवेदन दिल्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही.-गॉडफ्री पिमेंडा, विश्वस्त,वॉचडॉग फाऊंडेशन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here